मुंबई : विमाक्षेत्रातील अग्रगण्य कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने (एलआयसी) २०१८-१९ या वित्तीय वर्षातील व्यवहारांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार या कालावधीत एलआयसीच्या फर्स्ट इयर प्रिमियममध्ये ५.६८ टक्के वाढ झाली असून ती रक्कम १,४२,१९१.६९ कोटींवर पोहोचली आहे.
पेन्शन व सुपरअॅन्यूएशन योजनांच्या उलाढालीतून एलआयसीने ९१,१७९.५२ कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यात प्रीमियम रुपात ८२,८०७.८३ कोटी गोळा झाले असून गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण यंदा १० टक्क्यांनी अधिक आहे. मार्च २०१९ला संपलेल्या वित्तीय वर्षात एलआयसीला प्रीमियम रुपात ३,३७,१८५.४० कोटींचे उत्पन्न मिळाले असून आधीच्या वर्षी उत्पन्न ३,१७,८५०.९९ कोटी इतके होते. यंदा त्यात ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१८-२०१९च्या वित्तीय वर्षात विमाच्या रकमेपोटी एलआयसीने पॉलिसीधारकांना २,५०,९३६.२३ कोटीदेऊ केले. आधीच्या वित्तीय वर्षापेक्षा ही रक्कम २६.६६ टक्क्यांनी अधिक आहे.
उत्पन्नात ७.१० टक्के वाढ
२०१८-१९ या आर्थिक वर्षात एलआयसीचे उत्पन्न ५,६०,७८४.३९ कोटींवर पोहोचले. आधीच्या वर्षी ते ५,२३,६११.११ कोटी इतके होते.
यंदा त्यात ७.१० टक्के वाढ झाली. एलआयसीचे भांडवल ३१,११,८४७.२८ कोटी रुपये झाले आहे. गेल्या वित्तीय वर्षापेक्षा त्यात ९.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.