भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मधील आपली हिस्सेदारी सुमारे 9.3 टक्क्यांपर्यंत नेली आहे. विमा कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर 2022 ते 11 सप्टेंबर 2024 या कालावधीत खुल्या बाजारातील व्यवहारांद्वारे IRCTC मधील त्यांची हिस्सेदारी 2.02 टक्क्यांनी वाढली आहे. LIC ने IRCTC च्या इक्विटी शेअर्समधील आपली हिस्सेदारी 5,82,22,948 शेअर्स किंवा 7.28 टक्क्यांवरून 7,43,79,924 शेअर्स किंवा 9.29 टक्के केली आहे. अशा प्रकारे कंपनीने 1,61,56,976 शेअर्स खरेदी केले आहेत.
शेअरहोल्डिंग पॅटर्न -
IRCTC च्या शेअरहोल्डिंग पॅटर्नसंदर्भात बोलायचे झाल्यास, प्रमोटर्सचा अथवा प्रवर्तकांचा हिस्सा 62.40 टक्के एवढा आहे. तर, सार्वजनिक भागीदारी 37.60 टक्के एवढी आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या प्रमोटर्समध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे 62.40 टक्के हिस्सेदारी अथवा 49,91,72,170 एवढे शेअर्स आहेत.
अशी आहे शेअरची स्थिती -
बीएसईवर एलआयसीचा शेअर गेल्या बंद भावाच्या तुलनेत 1.81 टक्क्यांनी वधारून 1031.45 रुपयांवर बंद झाला आहे. आयआरसीटीसीसंदर्भात बोलायचे झाल्यास, या शेअरची किंमत 931.40 रुपयांवर आहे. एक दिवस आदीच्या तुलनेत हा शेअर 0.93% ने वाढून बंद झाला आहे.