भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ कधी येणार, आज येणार की उद्या येणार याची वाट पाहणाऱ्यांसाठी आजचा दिवस सुखावह ठरला आहे. आता एलआयसीच्या आयपीओबाबत सर्व माहिती समोर आली आहे. हा आयपीओ ४ मे रोजी सुरु होणार असून ९ मे रोजी बंद होणार आहे. तर अँकर गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ २ मे रोजी सुरु होणार आहे.
या आयपीओची सर्वात महत्वाची बाब म्हणजे या आयपीओद्वारे काही शेअर्स हे पॉलिसीधारकांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच सामान्य पॉलिसीधारकही या आयपीओतून शेअर्स घेऊ शकणार आहे. LIC च्या या आयपीओचा प्राईस बँड 902 रुपये ते 949 रुपये ठरविण्यात आला आहे. एक लॉट १५ शेअरचा असणार आहे. आज एलआयसी बोर्डाची एक महत्वाची बैठक झाली आहे. बिजनेस टुडेने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
पॉलिसीधारकांना किती सूट...रिटेल गुंतवणूकदार आणि एलआयसी कर्मचाऱ्यांना या आयपीओतून प्रति शेअर ४५ रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. तर पॉलिसीधारकांना प्रति शेअर ६० रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. या आयपीओची इश्यू साईज ही २१ हजार कोटी रुपयांची आहे. आयपीओद्वारे 22.14 कोटी शेअर्स विकले जाणार आहेत.
याआधी हा आयपीओ अजून मोठा असेल, असा अंदाज वर्तवला जात होता. सरकार आयपीओमध्ये आपली १० टक्के भागीदारी विकण्याचा प्रयत्न करेल, असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानंतर जेव्हा पहिला ड्राफ्ट जमा झाला तेव्हा सरकारने सेबीकडून ५ टक्के भागीदारी विकण्याची परवानगी घेतली होती. सरकारने आता व्हॅल्युएशनसुद्धा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता एलआयसीचे मूल्य ६ लाख कोटी रुपये एवढे रुपये एवढे निर्धारित करण्यात आले आहे.