Join us  

LIC चा आयपीओ १० मार्च रोजी येणार?, एका लॉटमध्ये ७ शेअर्स; एका शेअरची किंमत एवढी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 7:40 PM

LIC IPO Details: एलआयसीच्या आयपीओ खरेदीसाठी कमीत कमी किती रुपये लागतील याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. एलआयसीचा आयपीओ खुला होण्याची तारीख आता समोर आली आहे. 

LIC IPO Details: तुम्ही जर एलआयसीच्या आयपीओची वाट पाहात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. एलआयसीच्या आयपीओमध्ये लवकरच तुम्हाला गुंतवणूक करता येणार आहे. कारण एलआयसीचा आयपीओ बाजारात आणण्यासाठी केंद्र सरकारनं ३१ मार्चपर्यंतचं लक्ष्य ठेवलं आहे. यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार एलआयसीचा आयपीओ १० मार्च २०२२ रोजी खुला होण्याची शक्यता आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार एलआयसीचा आयपीओ १० मार्च रोजी खुला होणार आहे आणि १४ मार्चपर्यंत खुला राहणार आहे. तसंच एलआयसीच्या आयपीओची साइज तब्बल ६५ हजार कोटींपर्यंत असण्याची शक्यता आहे. किरकोळ गुंतवणुकदारांमध्ये एलआयसीच्या आयपीओबाबत सर्वाधिक उत्सुकता आहे. 

इशू प्राइज किती?एलआयसीच्या आयपीओसाठी अर्ज करण्यासाठी कमीत कमी किती रुपयांची आवश्यकता असणार आहे याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एलआयसीची इशू प्राइज (LIC IPO Issue Price) २ हजार ते २१०० रुपयांपर्यंत असणार आहे. यात जर तुम्ही अप्पर बँडच्या हिशोबानं किरकोळ गुंतवणूकदारासाठी विचार केला तर एका लॉटसाठी १४,७०० रुपये गुंतवावे लागणार आहेत. यात ७ शेअर्सचा एक लॉट असण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारकडून एलआयसीच्या प्राइज बँड आणि ओपनिंग डेटबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. समोर आलेली सर्व माहिती केवळ शक्यता आणि अंदाजित आहे. 

५ टक्के हिस्सा विकण्याची सरकारची तयारीएलआयसी विमा कंपनीनं १३ फेब्रुवारी रोजी सेबीकडे आयपीओसाठीचा ड्राफ्ट पेपर सुपूर्द केला आहे. यात कंपनी मार्चपर्यंत आपला ५ टक्के हिस्सा विकण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तयार आहे. ड्राफ्टनुसार एकूण ३१,६२,४९,८८५ शेअर्स उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. 

LIC चा मेगा आयपीओ बाजारात आल्यानंतर मार्केट कॅपमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीला मागे टाकत एलआयसी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरणार आहे. IPO बाबत सेबीकडे सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार सरकार ३१ कोटी इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून ५ टक्के हिस्सा विकणार आहे. सध्या सरकारची एलआयसीमध्ये १०० टक्के मालकी आहे. 

शेअर बाजारात तेजी येणार?LIC जगातील तिसरी सर्वात मोठी इन्श्यूरन्स कंपनी आहे. भारतात एलआयसीच्या तब्बल २९ कोटी पॉलिसी आहेत. यात बहुतांश जणांकडे एकापेक्षा अधिक पॉलिसी आहेत. त्यामुळे एकूण पॉलिसीधारकांची संख्या २० ते २५ कोटी इतकी असू शकते. तज्ज्ञांच्या मतानुसार एलआयसीचा आयपीओ आल्यानं शेअर बाजारात तेजी पाहायला मिळू शकते. याचा संपूर्ण शेअर मार्केटवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो. तसंच किरकोळ गुंतवणूकदारांचीही मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये एन्ट्री होऊ शकते. 

टॅग्स :एलआयसीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारनिर्देशांकएलआयसी आयपीओ