देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. २०,५५७ कोटी रूपयांच्या या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. सोमवारी ग्रे मार्केटमध्ये हा शेअर डिस्काऊंटवर मिळत होता. अशातच हा शेअर गुंतवणूकदारांना निराश करू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लिस्टिंगच्या एक दिवस आधीच म्हणजेच सोमवारी एलआयसीच्या आयपीओचा जीएमपी निगेटिव्ह २५ रुपयांपर्यंत घसरला आहे. एक अशी वेळ होती जेव्हा हा ग्रे मार्केटमध्ये ९२ रूपयांच्या प्रीमिअमवर ट्रेड करत होता. टॉप शेअर ब्रोकर्सच्या आकडेवारीनुसार, एलआयसीचा आयपीओ ग्रे मार्केट प्रीमिअम निगेटिव्ह १५ रुपयांवर होता. तर आयपीओ वॉचवर तो निगेटिव्ह २५ रुपयांपर्यंत पोहोचला होता. यावरून गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी नुकसान सोसावं लागू शकतं असे संकेत मिळत आहेत.
जीईपीएल कॅपिटलकडून एलआयसीचा आयपीओ डिस्काऊंटेड प्राईजवर लिस्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच यासाठी गुंतवणूकदारांना लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचा सल्ला देण्यात आला आहे. तर मेहता इक्विटिजचे रिसर्च अॅनालिसिस्ट आणि व्हाईस प्रेसिडेंट प्रशांत तापसे यांनी हा शेअर सामान्य रेटवर लिस्ट होण्याची शक्यता वर्तवली आहे. ज्यांना हा आयपीओ मिळालेला नाही, ते लिस्टिंगच्या दिवशीही यात गुंतवणूक करू शकतात असंही त्यांनी सांगितलं. तर एस्कॉर्ट्स सिक्युरिटिजचे रिसर्च हेड आसिफ इक्बाल यांनी एलआयसीचा शेअर दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकतो असं म्हटलं आहे.