मुंबई :
गेल्या आठवड्यात बाजारातील अनेक कंपन्यांच्या भांडवलात मोठी घसरण झाली असून, सर्वाधिक नुकसान एलआयसीला झाले आहे. १३ जून (सोमवारी) रोजी एलआयसीच्या अँकर गुंतवणूकदारांसाठी एक महिन्याचा लॉक इन कालावधी संपत आहे. त्यामुळे सोमवारी एलआयसीचे समभाग आणखी कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
इश्यू प्राइजच्या तुलनेत एलआयसीचे समभाग आतापर्यंत २५ टक्क्यांनी कोसळून ७०९ अंकांवर आले आहेत. त्याचा सामान्य गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. एलआयसी आयपीओ येण्याआधी एलआयसीने २ मे २०२२ रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी ५.९३ कोटी समभाग जाहीर केले होते. १२३ गुंतवणूकदारांकडून ९४९ रुपये प्रति समभाग या दराने ५,६२७ कोटी रुपये अँकर गुंतवणूकदारांकडून एलआयसीने गोळा केले होते. यात आयसीआयसीआय प्रूडेंशिअल लाइफ इन्सुरन्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्ससह अनेकांचा समावेश आहे. अनेक अँकर गुंतवणूकदार समभाग कोसळत असल्याने पैसे काढून घेण्याची शक्यता आहे. यामुळे एलआयसीचा समभाग आणखी घसरून ७०० अंकांच्या खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना मोठा फटका बसणार आहे.