Join us  

LIC कमाल योजना! केवळ ४४ रुपये गुंतवा, २८ लाखांचा फायदा कमवा; १०० वर्ष मिळतील पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 5:06 PM

LIC ने एक भन्नाट पॉलिसी आणली असून, यामध्ये तुम्हाला आयकरात सूटही मिळू शकते, असे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स...

नवी दिल्ली: भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ही देशातील सर्वांत मोठी आणि सर्वाधिक विश्वास असणारी कंपनी आहे. गेली अनेक दशके LIC आपल्या नानाविध पॉलिसी सादर करत आहेत. देशातील कोट्यवधी लोकं एलआयसीच्या विविध पॉलिसीचा लाभ घेत असतात. कालानुरुप आणि कालसुसंगत पॉलिसी सादर केल्यामुळे एलआयसी अद्यापही आघाडीवर आहे. आता एलआयसीने एक भन्नाट योजना आणली असून, यामध्ये दररोज केवळ ४४ रुपयांची बचत केल्यास आपणाला तब्बल २८ लाखांचा फायदा मिळू शकतो. शिवाय, १०० वर्षांपर्यंत पैसे मिळत राहतील.

एलआयसी ठराविक कायम नवनवीन पॉलिसी सादर करत असते. एलआयसीच्या या पॉलिसीचे नाव एलआयसी जीवन उमंग पॉलिसी (LIC Jeevan Umang Policy) असे आहे. ही एक ना-नफा आणि संपूर्ण जीवन विमा पॉलिसी आहे.  या पॉलिसी अंतर्गत, पॉलिसीधारकाला जीवन संरक्षणासह निश्चित मिळकतीचा लाभ मिळतो, असे सांगितले जाते. या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे या अंतर्गत तुम्हाला १०० वर्षांपर्यंतचे कव्हरेज मिळते.

नेमका काय आहे पॉलिसीचा प्लान?

एलआयसीची ही एक दीर्घकालीन गुंतवणूक पॉलिसी आहे, ज्यामध्ये ठराविक कालावधीनंतर पॉलिसीधारकाच्या खात्यात निश्चित रक्कम येणे सुरूवात होते. जर तुम्हाला एलआयसीच्या जीवन उमंग पॉलिसी अंतर्गत सुमारे २८ लाख रुपयांचा परतावा मिळवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला दरमहा केवळ १,३०२ रुपये प्रीमियम भरावा लागेल. अशा प्रकारे, दररोज तुम्हाला सुमारे ४४ रुपये वाचवावे लागतील. दरमहा १,३०२ रुपयांच्या प्रीमियमनुसार, तुम्हाला या योजनेत वार्षिक १५,६३४ रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही ही पॉलिसी ३० वर्षांसाठी घेतली तर तुम्हाला सुमारे ४.६८ लाख रुपये गुंतवावे लागतील. या पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर, LIC तुम्हाला दरवर्षी ४० हजार रुपयांचा निश्चित रिटर्न देईल, असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला ३० ते १०० वर्षांच्या दरम्यान सुमारे २७.६० लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो.

पॉलिसीचा अवधी १०० वर्षांपर्यंत 

तुम्हाला ही पॉलिसी घ्यायची असेल, तर तुम्ही ही पॉलिसी किमान २ लाख रुपयांच्या विम्याच्या रकमेवर खरेदी करू शकता. पॉलिसीची मुदत १०० वर्षांपर्यंत असू शकते. प्रीमियम भरण्यासाठी तुम्ही १५, २०, २५ आणि ३० वर्षांपैकी कोणतीही एक मुदत निवडू शकता. जर एखाद्या व्यक्तीचे वय ९० दिवसांपेक्षा जास्त असेल तर त्याच्या नावावर ही पॉलिसी घेता येईल. त्याच वेळी, ही पॉलिसी घेण्यासाठी कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे आहे. जर एखाद्या विमाधारकाचा मुदतपूर्तीपूर्वी मृत्यू झाला, तर विम्याची रक्कम विमाधारकाच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला दिली जाते. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला आयकर कलम ८०सी अंतर्गत कर सूट मिळते, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :एलआयसीगुंतवणूक