केंद्र सरकारने आज एलआयसी आयपीओचा ड्राफ्ट सेबीकडे सोपविला आहे. यामुळे एलआयसीच्या आयपीओच्या वाटेतील महत्वाचा भाग पूर्ण होत आला आहे. एलआयसी आयपीओमध्ये कंपनीची एकूण इक्विटी साईज ही 632 कोटी शेअर एवढी प्रचंड असणार आहे. यापैकी आयपीओमध्ये जवळपास 31.6 कोटी शेअर विकण्यात येणार आहेत.
दिपमच्या सचिवांनी ट्विटरवर एलआयसी पॉलिसीधारकांसाठी गुड न्यूज दिली आहे. एलआयसी पॉलिसीधारकांना याच्या १० टक्के शेअर मिळणार आहेत. एकूण शेअर्स पैकी सरकार पाच टक्के शेअर्स विकत आहे. हा आकडा 31.6 कोटी एवढा आहे. यापैकी 10 टक्के म्हणजे 3.16 कोटींहून अधिक शेअर पॉलिसीधारकांसाठी राखीव असणार आहेत. याचाच अर्थ एलआयसी पॉलिसीधारकांना हे शेअर्स मिळविण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत.
आणखी कोणाला वाटा मिळणार...IPO मसुद्यानुसार, त्यातील 50 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIBs) राखीव असतील. याचा अर्थ असा की एकूण 31,62,49,885 समभागांपैकी अर्धे म्हणजे सुमारे 15.8 कोटी समभाग QIB साठी बाजूला ठेवले जातील. त्याच वेळी, 15 टक्के शेअर्स गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येतील.
यापूर्वी, 2021-22 मध्ये निर्गुंतवणुकीतून 1.75 लाख कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. सरकारने यात घट करून 78 हजार कोटी रुपये केले आहेत. आतापर्यंत सरकारला निर्गुंतवणुकीतून केवळ 12 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. अशा परिस्थितीत, लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारच्या सर्व आशा एलआयसी आयपीओवर टिकून आहेत.