Join us

LIC Q4 Result : जबरदस्त निकालांनंतर एलआयसीचे शेअर्स बनले रॉकेट, कंपनीनं देणार गुंतवणूकदारांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 12:53 PM

एलआयसीचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले. यानंतर त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून आला.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीची लिस्टिंग होऊन एक वर्ष झालंय आणि गेल्या तिमाहीचे निकाल उत्कृष्ट आले आहेत. मार्च २०२३ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा (LIC Profit) जवळपास पाच पटीनं वाढला आहे. तथापि, कमाईच्या बाबतीत कंपनीला नुकसान झालं आहे आणि एलआयसीच्या निव्वळ उत्पन्नात (LIC Net Income) घट नोंदवली गेली आहे.

गेल्या वर्षी 17 मे 2022 रोजी शेअर बाजारात लिस्ट झालेल्या LIC चा नफा 2022-23 आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 13428 कोटी रुपये होता. एलआयसीने जाहीर केलेल्या इतर आकडेवारीवर नजर टाकल्यास,  कंपनीचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न 8 टक्क्यांनी कमी होऊन 1.31 लाख कोटी रुपये झाले आहे. एका वर्षापूर्वी ते 1.43 लाख कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 2022-23 साठी LIC चा निव्वळ नफा 35,997 कोटी रुपये झाला आहे, जो 2021-22 मध्ये केवळ 4,125 कोटी रुपये होता.

डिविडंट देण्याची घोषणा

चौथ्या तिमाहीच्या जबरदस्त निकालानंतर कंपनीनं 3 रुपये प्रति शेअर डिविडंट देण्याची घोषणा केली आहे. एलआयसीनं देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ आणला होता. याद्वारे कंपनीनं 21 हजार कोटी रुपये जमवले होते. परंतु शेअर बाजारातील त्याचं लिस्टिंग चांगलं झालं नव्हतं. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना कंपनीनं निगेटिव्ह 35 टक्के रिटर्न दिलेत.

निकालांनंतर शेअर्स वधारले

कंपनीचे तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर्सवरही याचा परिणाम दिसून आला. गुरुवारी शेअर बाजाराचं कामकाज सुरू झाल्यानंतर एलआयसीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती. कामकाजादरम्यान, एलआयसीचे शेअर्स 1.60 टक्क्यांच्या वाढीसह 603.15 रुपयांवर पोहोचले होते. कंपनीच्या लिस्टिंगपासूनच शेअर्समध्ये घसरणीचं सत्र सुरूच आहे. यामुळे कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन वर्षभरात 2 लाख कोटींनी घसरलं आहे.

(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

टॅग्स :एलआयसीशेअर बाजारगुंतवणूक