LIC Q4 Results: देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळानं म्हणजेच एलआयसीनं (LIC) सोमवारी ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. एलआयसीला चौथ्या तिमाहीत १३,७८२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या याच कालावधीतील १३,१९१ कोटी रुपयांच्या तुलनेत यात ४.५ टक्क्यांची वाढ झालीये. याव्यतिरिक्त, कंपनीने प्रति शेअर ६ रुपये अंतिम लाभांश जाहीर केलाय.
फर्स्ट इयर प्रीमियम इनकममध्ये (एफवायपीआय) एलआयसीनं भारतीय आयुर्विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून आपलं स्थान कायम राखलं आहे. कंपनीच्या फायलिंगनुसार, कंपनीचा एकूण मार्केट शेअर ५८.८७% आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एलआयसीचा वैयक्तिक व्यवसायात ३८.४४ टक्के आणि समूह व्यवसायात ७२.३० टक्के बाजार हिस्सा होता.
एकूण प्रीमियम उत्पन्नात वाढ
आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी एलआयसीनं एकूण ४,७५,०७० कोटी रुपयांचं प्रीमियम उत्पन्न नोंदवलं. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षातील ४,७४,००५ कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण किंचित जास्त आहे. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण वैयक्तिक व्यवसाय प्रीमियम ३,०३,७८६ कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील वर्षी याच कालावधीत २,९२,७६३ कोटी रुपये होता.
समीक्षाधीन कालावधीत समूह व्यवसायाचं एकूण प्रीमियम उत्पन्न १,७१,३०२ कोटी रुपये होतं. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षाच्या १,८१,२४२ कोटी रुपयांपेक्षा हे कमी आहे. मार्च २०२४ पर्यंत एलआयसीच्या असेट्स अंडर मॅनेजमध्ये (AUM) वाढ होऊन ५१,२१,८८७ कोटी रुपये झाली आहे. मार्च २०२३ पर्यंत नोंदवलेल्या ४३,९७,२०५ कोटी रुपयांपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. त्यात वार्षिक आधारावर १६.४८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
आर्थिक वर्षात किती पॉलिसींची विक्री?
३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात वैयक्तिक विभागात एकूण २,०३,९२,९७३ पॉलिसींची विक्री झाली. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षात विकल्या गेलेल्या २,०४,२८,९३७ पॉलिसींपेक्षा ही संख्या किंचित कमी आहे.