भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) बिहारच्या GST प्राधिकरणाकडून 290.50 कोटी रुपयांची टॅक्स नोटीस मिळाली आहे. ही नोटीस बिहारचे अतिरिक्त राज्य कर आयुक्त (अपील), केंद्रीय विभाग, पाटणा यांनी जारी केली असून व्याज आणि दंडासह जीएसटी भरण्याची मागणी करण्यात आलीये. एलआयसीनं (Life Insurance Corporation of India) या टॅक्स नोटीस विरोधात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी या नोटीसीच्याविरोधात जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणासमोर निर्धारित वेळेत अपील दाखल करेल असं एलआयसीनं २२ सप्टेंबर रोजी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय.
जीएसटी अधिकार्यांनी एलआयसीवर पॉलिसीधारकांकडून प्रीमियम पेमेंटवर घेतलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा परतावा न देणे यासह काही उल्लंघनांचा आरोप केला आहे. एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. बिहार वस्तू आणि सेवा कर (BGST) आणि केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) कायदा 2017 च्या 73(9) अंतर्गत कर नोटीस जारी करण्यात आली आहे आणि व्याज आणि दंडासह GST भरण्याची मागणीही करण्यात आलीये. शुक्रवारी एलआयसीचे शेअर्स बीएसईवर 651.20 रुपये आणि एनएसईवर 652.50 रुपयांवर किंचित घसरणीसह बंद झाले.
सनफार्मातील भागीदारी केली कमी
अलीकडेच एलआयसीनं सन फार्मामधील आपली 2 टक्के हिस्सा विकला. 4,699 कोटी रुपयांना खुल्या बाजारात हा व्यवहार झाला. आता LIC चा सन फार्मामधील हिस्सा 12,05,24,944 वरून 7,22,68,890 इक्विटी इतका झाला आहे. याआधी, एलआयसीचे फार्मा कंपनीतील भागभांडवल पेड अप कॅपिटलच्या 5.023 टक्के होते, जो आता 3.012 टक्क्यांवर आलेय. शेअर्सची विक्री सामान्य व्यवहारांतर्गत खुल्या बाजारातील विक्रीद्वारे केली गेली, ज्याची सरासरी किंमत प्रति शेअर 973.80 रुपये आहे. एलआयसीनं 2022 मध्ये आपला आयपीओ आणला होता. हा आयपीओ 21000 कोटी रुपयांचा होता. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आहे.