LIC Share: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या शेअर्सच्या लिस्टिंगनंतर यात सातत्याने घसरण सुरू होती. या घसरणीमुळे लाखो गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. पण, आता एलआयसीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शेअर्सने लिस्टिंग झाल्यानंतर पहिल्यांदाच 900 च्या पातळीला स्पर्श केला आहे. आज(मंगळवारी) शेअर 5.30% ने वाढून इंट्राडेमध्ये प्रति शेअर ₹ 900 पर्यंत पोहोचला.
मे 2022 मध्ये सूचीबद्ध झाल्यापासून LIC शेअर्सनी आता पहिल्यांदाच 900 रुपयांची पातळी गाठली आहे. विशेष म्हणजे, 17 मे 2022 रोजी LIC चे शेअर्स ₹ 949 च्या IPO किमतीच्या तुलनेत ₹ 875.25 वर सूचीबद्ध झाले होते. आता सुमारे अडीच वर्षांनी एलआयसीचे शेअर्स पुन्हा 900 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत.
एलआयसीच्या शेअर्समधील घसरणीचा कल मार्च 2023 पर्यंत कायम होता. या कालावधीत स्टॉक ₹530 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. एलआयसीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून प्रचंड वाढ सुरू झाली आणि आतापर्यंत सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये 12 टक्के, डिसेंबरमध्ये 22 टक्के आणि जानेवारीमध्ये आतापर्यंत 7.5 टक्के वाढ झाली आहे.
नोव्हेंबरपासून कंपनीचे बाजार भांडवल ₹ 1.84 लाख कोटींनी वाढून ₹ 5.64 लाख कोटींच्या स्तरावर पोहोचले आहे. CapitalMind चे दीपक शेनॉय यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीला सांगितले की, “ विमा व्यवसाय हा दीर्घकाळ टिकणारा व्यवसाय आहे. एलआयसी पुढील 2 वर्षांत भारतातील टॉप 8 सर्वात फायदेशीर कंपन्यांपैकी एक होऊ शकते." इतर तज्ञही शेअर खरेदीच्या बाजूने आहेत.
(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)