लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ प्रीमिअमने लिस्ट न होता ८ टक्के डिस्काउंटने नकारात्मक सूचिबद्ध (लिस्टिंग) होत सादर झाल्याने गुंतवणूकदारांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. बाजार बंद होताना तो ८.२५ रुपये म्हणजे केवळ ०.९५ टक्के वाढीने ८७५.४५ रुपयांवर पोहोचला. बाजारातील अस्थिरतेमुळे एलआयसीची सुरुवात कमकुवत झाली असे सांगण्यात येत असले, तरी एलआयसीचा आयपीओ बाजारात आणण्याची सरकारची घाई नडली असल्याचा सूर समाजमाध्यमांवर आळवला जात आहे.
एलआयसी आयपीओसाठी एका समभागासाठी ९४९ रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यावर ८१.८० रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला. त्यानंतर तो शेअर बाजारात ८७२ रुपयांवर लिस्ट झाला. एलआयसीचा इश्यू आतापर्यंतचा सर्वांत मोठा असतानाही तो केवळ २.९५ पट सब्सक्राइब झाला होता. तो ९ मे रोजी बंद झाला होता. परकीय गुंतवणूकदारांनी एलआयसी आयपीओकडे पाठ फिरवूनही समभाग किरकोळ आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी विकत घेतले.
नेमका फटका कशामुळे बसला?
बाजारातील अनपेक्षित परिस्थितीमुळे देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी एलआयसीची शेअर बाजारातील सुरुवात घसरणीने झाली असल्याचे मत गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (दीपम) विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी म्हटले आहे.
दीर्घकाळासाठी समभाग ठेवावा?
- कोणीही बाजाराची भविष्यवाणी करू शकत नाही. एलआयसीचे समभाग एक दिवसासाठी नव्हे, तर दीर्घकाळासाठी ठेवायला हवेत.
- सध्या बाजारात भीतीचे वातावरण असून, लगेच मोठा परतावा मिळण्याची शक्यता नसल्याचे पांडे यांनी म्हटले आहे.
२१,००० कोटी सरकारला मिळाले
केंद्र सरकारने एलआयसीमधील २२.१३ कोटी समभाग किंवा ३.५ टक्के हिस्सेदारी विकली असून, यातून सरकारला २१ हजार कोटी रुपये मिळाले आहेत.
किती वाढू शकतो?
परदेशी ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने एलआयसीचे समभाग एक हजारपर्यंत वाढू शकतात असे म्हणत तटस्थ रेटिंग दिले आहे.
४२,५०० कोटी एकाच दिवसांत नुकसान
९४९ रुपये प्रती समभागाच्या इश्यू किमतीवर एलआयसीचे बाजार भांडवल ६,००,२४२ कोटी होते. मात्र, समभागांची किंमत घसरल्याने एलआयसीचे बाजार भांडवल ५,५७,६७५ कोटींवर घसरले. यामुळे एकाच दिवसात एलआयसीचे तब्बल ४२,५०० कोटींचे नुकसान झाले.