देशातील सर्वात मोठा आयपीओ आणणारी आणि सर्वसामान्यांनाही पैसे कमविण्याची भुरळ पाडणारी सरकारी कंपनी एलआयसीने सर्वांचेच अंदाच चुकविले आहेत. आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाल्यावर जी कोसळण्यास सुरुवात झाली ती सतत चार दिवस सुरु होती. एवढी की देशातील सर्वात मोठ्या पाच मौल्यवान कंपन्यांच्या यादीतूनही एलआयसी बाहेर पडली आहे.
शुक्रवारी जेव्हा बाजार बंद झाला तेव्हा एलआयसीचा शेअर आतापर्यंतच्या खालच्या स्तरावर म्हणजेच 825 रुपयांवर बंद झाला. एलआयसीच्या शेअरचा उच्चांकी स्तर ९१८ रुपये होता. म्हणजेच एलआयसीचा शेअर १० टक्क्यांनी कोसळला आहे.
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार एलआयसीचे बाजार मुल्य सध्या 77,600 कोटी रुपयांहून खाली आले आहे. शुक्रवारी झालेल्या घसरणीनंतर एलआयसीकडे आता भारताची पाचवी सर्वात मौल्यवान कंपनीचा मुकूटही राहिलेला नाही. एकट्या शुक्रवारी एलआयसीच्या मुल्यात २२ हजार कोटींची घसरण झाली. हिंदुस्थान युनिलिव्हर पुन्हा एकदा पाचव्या क्रमांकावर आली आहे.
एलआयसीने आपल्या पॉलिसीधारकांना आणि कर्मचाऱ्यांना काही सूट दिली होती. तरी देखील हे गुंतवणूकदार नुकसानीत आहेत. आता हे शेअर ठेवायचे की विकायचे या दुविधेत हे गुंतवणूकदार आहेत. आता विकले तरी नुकसान होणार आणि ठेवल्यावर पुन्हा घसरले तरी नुकसान होणार आहे. वाढले तरच फायद्यात राहणार आहेत. पॉलिसीधारकांना ६० रुपये आणि कर्मचाऱ्यांना ४५ रुपयांची सूट देण्यात आली होती. हे शेअर 942 रुपयांना अलॉट झाले होते. रिटेल गुंतवणूकदारांना देखील ४५ रुपयांचा डिस्काऊंट दिला गेला होता. धक्कादायक बाब म्हणजे शुक्रवारी शेअर बाजार उसळला होता, तरी एलआयसीच्या शेअरमध्ये काही फरक झाला नाही.
अँजेल वनचे मुख्य सल्लागार अमर देव यांनी फायनान्शिअल एक्सप्रेसला सांगितले की, एलआयसीवर आंतरराष्ट्रीय परिस्थितींमुळे नकारात्मक परिणाम दिसत आहे. ही एक मोठी आणि विश्वासार्ह कंपनी आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी दीर्घ काळासाठी हे शेअर होल्ड करावेत. येत्या काही वर्षांत चांगल्या व्यवसायाची शक्यता आहे.