Join us  

अदानी समूहाच्या उच्च व्यवस्थापनाला भेटणार; एलआयसी अध्यक्षांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 11:52 AM

एसबीआयने अदानी समूहालाही जास्त कर्ज दिल्याचे म्हटले जात होते. यानंतर, एसबीआय अध्यक्षांनी एक निवेदन जारी करत सांगितले की, बँकेने अदानी समूहाला 27000 कोटींचे कर्ज दिले आहे.

नवी दिल्ली : अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सबाबत हिंडेनबर्गचा रिपोर्टसमोर आल्यानंतर बाजारात खळबळ उडाली होती. या संपूर्ण प्रकरणात अदानी समूहातील एलआयसीच्या गुंतवणुकीबाबत सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याशिवाय, एसबीआयने अदानी समूहालाही जास्त कर्ज दिल्याचे म्हटले जात होते. यानंतर, एसबीआय अध्यक्षांनी एक निवेदन जारी करत सांगितले की, बँकेने अदानी समूहाला 27000 कोटींचे कर्ज दिले आहे.

आता भारतीय आयुर्विमा महामंडळचे (LIC) अध्यक्ष एमआर कुमार म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्रातील मोठी कंपनी एलआयसीचे अधिकारी अदानी समूहाच्या उच्च व्यवस्थापनासोबत (टॉप मॅनेजनेंट) बैठक घेणार आहेत. यादरम्यान विविध व्यवसायाशी संबंधित समूहामधील संकटाबाबत स्पष्टीकरण मागवले जाणार आहे. दरम्यान, अदानी समूहातील एलआयसीच्या गुंतवणुकीवर विरोधी पक्ष तसेच गुंतवणूकदार टीका करत आहेत. 

हिंडेनबर्ग या अमेरिकन आर्थिक संशोधन आणि गुंतवणूक कंपनीच्या रिपोर्टनंतर अनेक समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. रिपोर्टमध्ये अदानी समूहावर कथित बाजारातील हेराफेरी आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे, अदानी समूहाने हिंडेनबर्गचा रिपोर्ट फेटाळून लावत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. 

आर्थिक निकालांची घोषणा करताना एलआयसीचे अध्यक्ष एमआर कुमार म्हणाले, "आमच्या गुंतवणूकदारांच्या टीमने आधीच अदानी समूहाकडून स्पष्टीकरण मागितले असले, तरी आमचे उच्च व्यवस्थापन या प्रकरणी त्यांच्याशी संपर्क साधेल. आम्ही सध्या आर्थिक निकालांमध्ये व्यस्त होतो. आम्ही लवकरच त्यांना भेटू आणि त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागू. मार्केट आणि ग्रुपमध्ये काय चालले आहे, ते आम्हाला समजून घ्यायचे आहे." दरम्यान, एमआर कुमार यांनी मात्र एलआयसी आणि अदानी ग्रुपमधील बैठकीची कोणतीही टाइमलाइन दिली नाही.

टॅग्स :एलआयसीअदानीव्यवसायगौतम अदानी