Join us

एलआयसीला एका दिवसात ₹१००० कोटींचं मोठं नुकसान, ‘या’ खासगी बँकेचा शेअर ५ वर्षांच्या लो वर

By जयदीप दाभोळकर | Updated: March 12, 2025 11:31 IST

LIC Indusind Bank Share Price: या बँकेच्या शेअरमध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. बँकेचा शेअर २७.१७ टक्क्यांच्या घसरणीसह ६५५.९५ रुपयांवर बंद झाला, जो पाच वर्षांतील नीचांकी स्तर आहे. या घसरणीमुळे एलआयसीचं सुमारे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झालं.

LIC Indusind Bank Share Price: इंडसइंड बँकेच्या (Indusind Bank Share Price) शेअरमध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. बँकेचा शेअर २७.१७ टक्क्यांच्या घसरणीसह ६५५.९५ रुपयांवर बंद झाला, जो पाच वर्षांतील नीचांकी स्तर आहे. या घसरणीमुळे देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी एलआयसीचं सुमारे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झालं. एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. या बँकेत एलआयसीचे ५.२३ टक्के शेअर्स आहेत. बँकेनं आपल्या डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमध्ये काही विसंगतींची माहिती दिली. याचा एकरकमी परिणाम बँकेच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. यामुळे बँकेचे शेअर्स घसरले आणि नोव्हेंबर २०२० नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

आरबीआयनं १ एप्रिल २०२४ पासून नवे नियम लागू केले आहेत. या नियमांनंतर बँकेनं आपल्या डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओचा अंतर्गत आढावा घेतला. या आढाव्यात बँकेला काही त्रुटी आढळून आल्या. बँकेच्या मालमत्ता आणि दायित्वांशी संबंधित खात्यांमध्ये ही तफावत आढळून आली. बँकेच्या अंतर्गत आढाव्यानुसार, या चुकीचा परिणाम त्याच्या एकूण मालमत्तेच्या सुमारे २.३५% इतका असेल. म्हणजेच ती सुमारे २,०००-२,१०० कोटी रुपयांच्या बरोबरीची आहे.

कोणा-कोणाला झालं नुकसान?

शेअरची किंमत ६५४ रुपयांच्या नीचांकी पातळीवर असताना एलआयसीच्या शेअर्सचे मूल्य २,४३४ कोटी रुपये होतं. आदल्या दिवसाच्या बंद भावानुसार हे मूल्य ३,३९८ कोटी रुपये होते. केवळ एलआयसीच नाही तर कोटक म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, यूटीआय एमएफ आणि फ्रँकलिन इंडिया सारख्या अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांकडेही या बँकेचे शेअर्स आहेत.

या तोट्याचा परिणाम आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीच्या नफ्यावर दिसणार आहे. यामुळे बँकेच्या नफ्यात मोठी घट होऊ शकते. आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीतही बँकेला तोटा होऊ शकतो. गेल्या वर्षभरात इंडसइंड बँकेचा शेअर निफ्टी ५० निर्देशांकातील सर्वात खराब कामगिरी करणारा आहे. या दरम्यान त्याच्या किंमतीत ५५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

बँकेची समस्या

बँकेला इतरही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये खराब ऑपरेशनल परफॉर्मन्सचा समावेश आहे. तसंच बँकेच्या एमडीना एक वर्षाचा कार्यकाळ देण्यात आला आहे, तर संचालक मंडळानं तीन वर्षांचा कार्यकाळ प्रस्तावित केला होता. अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी इंडसइंड बँकेचे शेअर रेटिंग कमी केलंय आणि त्यांचं टार्गेट प्राइस कमी केलंय. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इंडसइंड बँकेचा समावेश असलेल्या ३८ विश्लेषकांपैकी चार विश्लेषकांनी बँकेच्या शेअर्सना सेल रेटिंग दिलंय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :एलआयसीशेअर बाजारगुंतवणूक