LIC Policy News : आजकाल कुणालाही कॉल लावल्यानंतर सायबर क्राईमची माहिती देणारी सूचना पहिल्यांदा ऐकायला मिळते. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यानंतरही सायबर क्राईमच्या घटना कमी होताना दिसत नाही. गुन्हेगारांनी आता बँक ग्राहकांनंतर एलआयसी पॉलिसी धारकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळने (LIC) अलीकडेच आपल्या ग्राहकांना अशा प्रकारच्या सायबर फसवणूक टाळण्याचा सल्ला दिला आहे.
यामध्ये LIC पॉलिसी धारकांना पॉलिसीवर बोनस मिळणार असल्याचे आमिष दाखवले जाते. यासाठी तुम्हाला पॉलिसी क्रमांक, बँक तपशील किंवा KYC माहिती विचारली जाते. एलआयसी कधीही ग्राहकांना त्यांच्या पॉलिसी किंवा बँकेशी संबंधित माहिती फोन, एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे विचारत नाही. अशा परिस्थितीत जर कोणी व्यक्ती किंवा संस्था असे करत असेल तर ती फसवणूक आहे, अशी माहिती एलआयसीने दिली आहे.
एलआयसीचे ग्राहकांना आवाहनएलआयसीने सार्वजनिक नोटीस जारी केली आहे की ग्राहकांनी कोणत्याही अनोळखी कॉल, संदेश किंवा ईमेलवर विश्वास ठेवू नये आणि आर्थिक नफ्याचा दावा केला जात असलेल्या कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये. एलआयसीने आपल्या ग्राहकांना त्यांच्या पॉलिसीचे तपशील, बँकिंग माहिती किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्ती किंवा संस्थेला देऊ नये, असा इशारा दिला आहे. याशिवाय एलआयसीने आपला अधिकृत WhatsApp क्रमांक 8976862090 देखील शेअर केला आहे. जिथे ग्राहक त्यांच्या शंकांचे निरसन करू शकतात.
तुम्हाला फेक कॉल किंवा मेसेज आल्यावर काय करावे?जर एखाद्या ग्राहकाला बनावट कॉल किंवा मेसेज आला तर तो लगेच LIC ला spuriouscalls@licindia.com वर कळवू शकतो. याशिवाय नॅशनल सायबर क्राइम पोर्टलवर (https://cybercrime.gov.in/) ऑनलाइन आर्थिक फसवणुकीची तक्रार नोंदवता येईल किंवा सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक 1930 वर कॉल करून मदत घेतली जाऊ शकते. अशा प्रकारची सायबर फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी नेहमी सतर्क राहून केवळ अधिकृत वेबसाइट वापरावी, असा सल्ला कंपनीने दिला आहे.