मुंबई - सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या बहुप्रतिक्षीत आयपीओबाबत आता चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. सरकारने सोमवारी सेबीजवळ आयपीओचा संशोधित ड्राफ्ट जमा केला आहे. त्यानंतर आज एलआयसीच्या बोर्डाची बैठक होणार आहे. संशोधित ड्राफ्टमध्ये सरकारने एलआयसीचे व्हॅल्युएशन कमी केले आहे. तसेच आयपीओची साईझसुद्धा घटवली आहे. मात्र आतापर्यंत इश्यू प्राइस बँडबाबत स्थिती स्पष्ट झालेली नाही.
एलआयसीचा हा आयपीओ रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ४ मे रोजी ओपन होणार आहे. तसेच हा आयपीओ बिडिंगसाठी ९ मेपर्यंत खुला राहणार आहे. अँकर इन्व्हेस्टर्ससाठी एलआयसीचा आयपीओ २ मे रोजीच ओपन होईल. आज बोर्डाच्या बैठकीमध्ये त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून २१ हजार कोटी रुपये जमवण्याची योजना सरकारने आखली आहे. त्यानुसार एलआयसीचा हा पहिला इश्यू भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ बनणार आहे.
मात्र याआधी हा आयपीओ अजून मोठा असेल, असा अंदाज वर्तवला जात होता. सरकार आयपीओमध्ये आपली १० टक्के भागीदारी विकण्याचा प्रयत्न करेल, असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानंतर जेव्हा पहिला ड्राफ्ट जमा झाला तेव्हा सरकारने सेबीकडून ५ टक्के भागीदारी विकण्याची परवानगी घेतली होती. सरकारने आता व्हॅल्युएशनसुद्धा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता एलआयसीचे मूल्य ६ लाख कोटी रुपये एवढे रुपये एवढे निर्धारित करण्यात आले आहे.
सध्याच्या माहितीनुसार पाहिले तर एलआयसीच्या आयपीओसाठी प्राइस बँड ९५० रुपयांच्या आसपास राहण्याच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती नंतरच मिळणार आहे. सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर येणाऱ्या दिवसांत बाजाराची परिस्थिती सुधारली तर एलआयसीच्या आयपीओची साईज वाढवून ५ टक्के करण्यात येऊ शकते. त्याशिवाय आयपीओचा लॉट साईज काय असेल, याबाबतचीही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.