उद्योगपती रतन टाटांचे नाव शंतनू नायडू नावाच्या एका तरुणाशी जोडले गेले होते. तेव्हा हा शंतनू कोण, काय करतो, रतन टाटांनी त्याच्या स्टार्टअपमध्ये एवढे पैसे का गुंतवले आदी अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाले होते. आता हाच शंतनू नायडू टाटा मोटर्समध्ये एका मोठ्या पदावर रुजू झाला आहे. याबाबत त्याने लिंक्डइनवर एक भावूक पोस्ट टाकली आहे.
रतन टाटांचे नुकतेच निधन झाले तेव्हा त्यांनी बनविलेल्या मृत्यूपत्रात शंतनूला शिक्षणासाठी दिलेले कर्जही त्यांनी माफ केले होते. शंतनूने वृद्धांच्या मदतीसाठी Goodfellows सुरु केली होती. त्यात टाटांनी स्वत: पैसे गुंतविले होते. ते पैसेही त्यांनी तसेच त्याच्या स्टार्टअपसाठी सोडले होते.
आज हाच शंतनू टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर झाले आहे. त्याच्याकडे स्टॅटेजिक इनिशिएटीव्हची जबाबदारी देण्यात आली आहे. शंतनूने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. '' मला आठवतेय की जेव्हा माझे वडील पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची पँट घालून टाटा मोटर्समधून घरी यायचे, तेव्हा मी त्यांची खिडकीत वाट पाहत उभा असायचो. आयुष्य जिथून सुरु झालेले पुन्हा तिथेच आले आहे'', असे शंतनूने म्हटले आहे. शंतनूने २०१४ मध्ये पुणे विद्यापीठातून इंजिनिअरिंग केले आहे. यानंतर त्याने २०१६ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून एमबीए केले आहे. 2018 मध्ये शंतनूने रतन टाटांचा सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या जवळचा झाल्याने शंतनू चर्चेत आला होता. गेल्या वर्षी ९ ऑक्टोबरला रतन टाटांचे निधन झाले होते. शंतनु आणि रतन टाटांची मैत्री खूप अनोखी होती. त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की, टाटांनी आपल्या मृत्यूपत्रात शंतनुच्या नावे एक मोठा हिस्सा ठेवला होता.