Join us  

Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 10:41 AM

१ एप्रिलपासून ८०० औषधांच्या किमती वाढल्या आहेत. आता जीवनावश्यक औषधांच्या किंमती वाढवण्यात येणार आहेत. पाहा कोणत्या औषधांचा यात समावेश आहे.

Medicine Price Hike: नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीनं (National Pharmaceutical Pricing Authority -NPPA) आठ औषधांच्या ११ फॉर्म्युलेशनच्या किमतीत ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यास मान्यता दिली आहे. याचा उद्देश सार्वजनिक आरोग्याच्या गरजांसाठी कायम औषधं उपलब्ध करून देणं हा असल्याचं एनपीपीएचं म्हणणं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, औषध (मूल्य नियंत्रण) आदेश, २०१९ च्या पॅरा १९ अंतर्गत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून लोकांना बाजारात जीवनावश्यक औषधं माफक दरात मिळू शकतील. औषध कंपन्यांकडून दरवाढीची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती.

औषध निर्मितीचा खर्च वाढल्याचं औषध कंपन्यांचे म्हणणे आहे. औषधासाठी आवश्यक असलेल्या अनेक साहित्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे औषधांच्या दरात वाढ करण्यात आली असल्याचं म्हटलं जातंय. दमा (asthma), ग्लुकोमा (glaucoma), थॅलेसेमिया (thalassemia), टीबी (tuberculosis) आणि मानसिक आरोग्याच्या (mental health) उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांचा यात समावेश आहे.

'या' औषधांच्या किंमती वाढणार

ज्या औषधांच्या किमती वाढतील त्यात बेंझिल पेनिसिलिन १० लाख IU इंजेक्शन, अॅट्रोपिन इंजेक्शन ०.६ mg/ml, इंजेक्शनसाठी स्ट्रेप्टोमायसिन पावडर (७५० एमजी आणि १००० एमजी), सॅल्बुटामोल गोळ्या (२ एमजी आणि ४ एमजी) आणि रेस्पिरेटर सोल्युशन (५ mg/ml), पिलोकार्पाइन २ पर्सेंट ड्रॉप, सेफॅड्रोक्सिल ५०० एमजी, इंजेक्शनसाठी डेस्फेरोक्सामाइन ५०० एमजी आणि लिथियम टॅब्लेट ३०० एमजी यांचा समावेश आहे. यापूर्वी २०१९ आणि २०२१ मध्ये औषधांच्या किंमतीत ५० टक्के वाढ करण्यात आली होती.

जीवनावश्यक औषधं म्हणजे काय?

या यादीमध्ये अशा औषधांचा समावेश आहे ज्याचा वापर बहुतांश लोकांकडून केला जातो. या औषधांच्या किमती सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. कंपनी वर्षभरात या औषधांच्या किंमतीत केवळ १० टक्के वाढ करू शकते. या यादीमध्ये कर्करोगविरोधी औषधांचाही समावेश आहे.

पेन किलरच्याही किंमतीत झालेली वाढ

१ एप्रिलपासून ८०० औषधांच्या किमती वाढल्या आहेत. या औषधांच्या यादीमध्ये पेन किलर, अँटीबायोटिक्स आणि अँटी इनफेक्शन औषधांचा समावेश होता. नॅशनल लिस्ट ऑफ एसेंशियल मेडिसिन (एनएलईएम) अंतर्गत औषधांच्या किमती गेल्या वर्षी आणि २०२२ मध्ये विक्रमी १२ टक्के आणि १० टक्क्यांनी वाढल्या होत्या.

टॅग्स :औषधंसरकार