Join us  

LICने पार रडवले! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी बुडाले; सर्वांत फ्लॉप ठरला IPO

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 4:32 PM

गेल्या वर्षभरात सुमारे ३० IPO शेअर मार्केटमध्ये आले. त्यात LIC च्या खराब कामगिरीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

LIC IPO Share: गेल्या आर्थिक वर्षात एकीकडे शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असताना दुसरीकडे, कंपन्यांचे IPO एकामागून एक शेअर बाजारात धडकत होते. काही आयपीओ सुपरहिट ठरले, तर काहींनी गुंवतणूकदारांवर अगदी रडायची वेळ आणली, असे सांगितले जात आहे. यापैकी एक IPO हा भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC चा असल्याचे सांगितले जात आहे. 

नकारात्मक परतावा मिळालेल्या ४० टक्के आयपीओमध्ये एलआयसीने मूल्याच्या बाबतीत सर्वाधिक नुकसान केल्याचे म्हटले जात आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ३० आयपीओ लाँच करण्यात आले होते. ज्यापैकी १४ शेअर्सने आतापर्यंत नकारात्मक परतावा दिला आहे. बाजारातील दबावामुळे अनेक आयपीओंचा परतावा कमी किंवा उणे झाला आहे. असे असले तरी जवळपास ६० टक्के आयपीओ असे आले, ज्यात गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल आहे.  यापैकी दोन आयपीओंनी १०० टक्क्यांहून अधिक तर काहींनी ४० ते ५० टक्क्यांपर्यंत परतावा दिला.

LIC IPO मुळे गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी बुडाले

मूल्याच्या बाबतीत सर्वांत जास्त तोटा एलआयसी इंडियाच्या आयपीओमध्ये झाला आहे. ९४९ रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत शेअर्समध्ये ४४ टक्क्यांची घसरण झाली. आताच्या घडीला LICचा शेअर ५३२ रुपयांवर व्यवहार करत आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटींहून अधिक रुपये बुडाले आहेत. जेव्हा कंपनीचा आयपीओ आला तेव्हा त्याचे मूल्यांकन ६ लाख कोटी इतके होते, जे आता ३.४ लाख कोटींच्या आसपास घसरले आहेत. यामुळे गुंतवणुकदारांना २.६ लाख कोटींचे नुकसान सोसावे लागले.

दरम्यान, गेल्या एक वर्षाबद्दल बोलायचे तर टक्केवारीच्या परताव्याच्या बाबतीत एलिन इलेक्ट्रॉनिकचा आयपीओ सर्वात वाईट ठरला आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी सूचीबद्ध झालेला हा शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर आयपीओ किंमतीच्या तुलनेत ५२ टक्के घसरला असून, शेअर २३०.६५ रुपयांच्या आयपीओ किमतीच्या तुलनेत सध्या ११८.४० रुपयांवर आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :एलआयसीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार