नवी दिल्ली : तुम्ही कोणत्याही कंपनीकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. इन्शुरन्स रेग्युलेटर इरडाने (IRDAI) महिनाभरापूर्वी नियमांमध्ये बदल जाहीर केले होते. मात्र, इरडाने लागू केलेले नवीन नियमांवर इन्शुरन्स कंपन्या नाराज आहेत. जुने नियम पुन्हा लागू करण्याची कंपन्यांची इच्छा होती. परंतु इरडाने नियमांमध्ये कोणतेही बदल करण्यास नकार दिला आहे.
नवीन नियमांनुसार, तुम्ही कोणत्याही कारणास्तव लाइफ इन्शुरन्स पॉलिसी मध्येच बंद केल्यास, तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे परत मिळतील. पैसे परत मिळवण्याच्या या प्रक्रियेला स्पेशल सरेंडर व्हॅल्यू (SSV) म्हणतात. एचडीएफसी लाइफच्या प्रवक्त्याने मनीकंट्रोलला सांगितले की, पॉलिसीधारकाला पॉलिसी लवकर बंद केल्यावर पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळाल्याने कंपनीच्या नफ्यावर जवळपास १०० बेस पॉइंट्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु आम्ही ही कमतरता ग्राहकांना मिळणाऱ्या फायद्यांशी तडजोड न करता दूर करण्याचा प्रयत्न करू. आम्हाला विश्वास आहे की, नवीन नियम दीर्घकाळात संपूर्ण इन्शुरन्स इंडस्ट्रीच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतील.
सुरुवातीच्या वर्षांतच मोठ्या संख्येने लोक आपली पॉलिसी सरेंडर करतात. त्यामुळे अशा लोकांसाठी हा नवा नियम अतिशय फायदेशीर आहे. तुम्हाला नंतरच्या वर्षांत सरेंडरवर जास्त पैसे मिळतील, पण सुरुवातीच्या वर्षांच्या तुलनेत ही रक्कम कमी असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तर इन्शुरन्स कंपन्यांना रेग्युलेट करणारी संस्था इरडाचे म्हणणे आहे की, जर तुम्ही पॉलिसी मध्येच बंद केली, तर तुम्हाला मिळणारे पैसे (SSV) कमीत कमी इतके असले पाहिजे की, जितके पैसे भविष्यात मिळणाऱ्या सम इंश्योर्ड आणि इतर लाभांसह मिळून आजच्या हिशोबानुसार होतात. इन्शुरन्स कंपन्या या नियमाच्या विरोधात होत्या. इन्शुरन्स हा पैसे लवकर काढण्यासाठी नसून भविष्यासाठी बचत करण्यासाठी आहे, असा कंपन्यांचा दावा होता.
नवीन नियमांमुळे कंपन्यांना जास्त पैसे राखीव ठेवावे लागतील. या नियमाचे पालन करून भविष्यातील दाव्यांसाठी पैसे स्वतंत्रपणे जमा केले जातील. यासाठी कंपन्यांना अधिक भांडवल लागेल, असे एका प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीच्या सीईओचे म्हणणे आहे. तसेच, लोकांनी पॉलिसी मध्येच सोडल्यास अधिक पैसे देण्यापेक्षा चुकीच्या विक्रीच्या बाबतीत संपूर्ण प्रीमियम परत करणे चांगले आहे. सुरुवातीला आकारले जाणारे विमा शुल्क खूप जास्त असून एजंटला दिलेले कमिशन वसूल करणे अवघड असल्याचेही त्यांनी सांगितले.
याचबरोबर, इरडाने आता तेच नियम लाईफ इन्शुरन्स कंपन्यांसाठी लागू केले आहेत, जे आधीपासून आरोग्य आणि सामान्य विमा कंपन्यांना लागू होते. म्हणजेच आता प्रत्येक इन्शुरन्स कंपनीला त्यांच्या ग्राहकांना ग्राहक माहिती पत्रक (CIS) द्यावे लागेल. या पत्रात पॉलिसीशी संबंधित सर्व माहिती सोप्या भाषेत लिहिली जाईल, जसे की इन्शुरन्सच्या अटी, फायदे, प्रीमियमची रक्कम आणि इतर महत्त्वाची माहिती.