Join us

LMOTY 2022: १९८६ साली दादर स्टेशनवर उतरलो तेव्हा...; टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रसेकरन यांनी सांगितला टाटांसोबतचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 6:51 AM

Lokmat Maharashtrian of the year awards 2022: काळजी नको, इंडिया इज एक्स्ट्रीमली वेलप्लेस्ड! टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रसेकरन यांचा दृढ विश्वास

‘वाढलेले व्याजदर आणि भडकलेली महागाई यामुळे अमेरिका, युरोप, ब्रिटनसह सगळ्याच अर्थव्यवस्था आज अडचणीत आहेत. त्यातून उभ्या राहिलेल्या शंकाकुशंकांचे सावट जगभरातल्या सगळ्याच उद्योगविश्वावर आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ खुंटलेलीच असेल; तरीही या जागतिक गुंतागुंतीत भारताची परिस्थिती भक्कम आहे.. इंडिया इज एक्स्ट्रीमली वेलप्लेस्ड,’ असा विश्वास टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रसेकरन यांनी व्यक्त केला. 

 ‘लोकमत - महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड’ हा सन्मानाचा पुरस्कार कृतज्ञतेने स्वीकारल्यानंतर लोकमत समूहाचे संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांच्याबरोबरच्या संवादात ते बोलत होते. भारताची अर्थव्यवस्था लवकरच पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडून जाईल. एवढेच नव्हेतर, महाराष्ट्रालाही एक  ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठण्याची संधी आहे, असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्राला मुसंडी मारण्याची मोठी संधी शाश्वत ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि अन्य आधुनिक उद्योगांमध्ये महाराष्ट्राला मुसंडी मारण्याची मोठी संधी आहे; आणि त्याकरिता टाटा समूह महाराष्ट्र सरकारच्या सतत संपर्कात आहे, असेही चंद्रसेकरन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर केले.

भारत जागतिक सावटातून सहीसलामत बाहेर येईलभारताच्या ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेचा आकार,  ‘कंंज्यूमर इकॉनॉमी’ची ताकद आणि पायाभूत संरचनेच्या विकासाशी जोडली गेलेली  ‘ग्रोथ’ ही भारताची बलस्थाने असून, त्या बळावर भारत या जागतिक सावटातून सहीसलामत बाहेर येईल, असा विश्वासही चंद्रसेकरन यांनी व्यक्त केला.

रुपयाबद्दल... भारतीय रुपयाचे मूल्य घटते आहे, तीच परिस्थिती अन्य देशांचीही आहे. पण, अन्य सशक्त चलनांच्या तुलनेत रुपयाची कामगिरी उजवीच आहे, हे विसरून चालणार नाही!’ ‘फाईव्ह जी’ सेवा प्रत्यक्ष ग्राहकांना पुरविण्याच्या व्यवसायात टाटा समूह उतरणार नाही, असेही स्पष्ट केले.

१९८६ साली दादर स्टेशनवर उतरलो तेव्हा...१९८६ साली मी कॉम्प्युटर इंजिनिअर झालो. इंटर्नशिप करायची होती म्हणून टाटांकडे अर्ज केला. निवड झाली. पहिल्यांदा चेन्नईहून बॉम्बे मेलने मुंबईला येऊन दादर स्टेशनवर उतरलो, तेव्हा मुंबई शहराच्या त्या पहिल्या दर्शनाने भांबावून गेलो होतो, एन. चंद्रसेकरन सांगत होते. तिथून मग दुसरी ट्रेन पकडून मानखुर्दपर्यंत गेलो. वाशीमध्ये मित्रासोबत भाड्याच्या खोलीत राहून टाटा समूहाबरोबरचा प्रवास सुरू केला.  चंद्रशेखरन म्हणाले, आज छत्तीस वर्षं झाली, मी टाटांबरोबर काम करतो आहे. या कंपनीने मला संधी दिली, आव्हानं दिली, मूल्यं शिकवली. मी अत्यंत कृतज्ञ आहे : टाटांचा आणि मुंबई या शहराचाही! हे शहर तुम्हाला आत्मविश्वास देतं. वाट्टेल त्या प्रसंगाशी दोन हात करण्याची हिंमत शिकवतं!’ 

टॅग्स :टाटालोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2022