नवी दिल्ली : वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी जूनमध्ये रेपो दरात आणखी वाढ करण्याचे संकेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले आहेत. त्यामुळे कर्ज आणखी महाग होणार असून, ईएमआय वाढणार आहे.
दास यांनी सांगितले की, किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर मागील ४ महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टाच्या वर आहे. ‘धोरणात्मक व्याजदरांत वाढ होण्याची शक्यता आहे. ती किती होईल, हे मी आताच सांगू शकत नाही. रेपो दर वाढून ५.१५ टक्के होईल, असे लगेच म्हणणे योग्य ठरणार नाही.’
पतधोरण समितीची पुढची बैठक ६ ते ८ जून दरम्यान होईल. या बैठकीत व्याजदर वाढीचा निर्णय होऊ शकतो. त्यानंतर बँका कर्जाचे दर वाढवतील.
उच्च तापमानामुळे महागाई वाढणार
दीर्घकाळपर्यंत उच्च तापमान राहिल्यास भारतात महागाई वाढून वृद्धी घसरू शकते, असा इशारा मूडीजने दिला आहे. यंदा भारतात मार्चपासूनच तापमान वाढले. मेमध्ये ४९ डिग्री सेल्सिअस तापमान झाले. या पार्श्वभूमीवर मूडीजने म्हटले की, दीर्घ काळ अधिक तापमान राहिल्यास गहू उत्पादनासह वीजकपातीचे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे महागाई वाढण्याचा धोका आहे.