Join us

कर्ज महाग, तरीही महागड्या घरांची कोटीच्या कोटी उड्डाणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2023 2:31 PM

दीड कोटीपेक्षा महाग घरांची विक्री वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशातील ७ प्रमुख शहरांमध्ये आलीशान आणि महागड्या घरांची मागणी वाढली आहे.  जानेवारी ते मार्च तिमाहीत विकलेल्या घरांत १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांचा वाटा वाढून तब्बल २२ टक्के झाला आहे. रिअल इस्टेट सल्लागार संस्था ‘जेएलएल’ने मुंबई, दिल्ली, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या ७ शहरांतील घरांच्या विक्रीचे विश्लेषण केले आहे.

आलिशान घरांचा वाटा २२ टक्क्यांवर

आरबीआयने केलेल्या रेपो दरातील वाढीमुळे गृहकर्ज ४ ते १२ टक्के महाग झालेले असतााना घरांच्या विक्रीतही वाढ झाली आहे, हे विशेष. १.५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या घरांच्या विक्रीची हिस्सेदारी वाढून २२ टक्के वाढ झाली आहे. २०२२ मध्ये ही हिस्सेदारी १८ टक्के होती.

मध्यमवर्गीयांकडून सर्वाधिक घरखरेदी

५० लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांची  विक्रीतील हिस्सेदारी २२ टक्क्यांवरून घटून १८ टक्के झाली आहे. मध्यम गटातील म्हणजेच ५० ते ७५ लाख रुपये किमतीच्या घरांची विक्रीतील हिस्सेदारी सर्वाधिक २५ टक्के राहिली. 

घरांच्या मागणीत आणखी वाढीचे संकेत

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात २.५ टक्के वाढ केलेली असतानाही २०२३ च्या पहिल्या तिमाहीत निवासी क्षेत्राने मजबूत वृद्धी दर्शविली आहे. त्यामुळे यंदा घरांची मागणी वाढेल, असे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :सुंदर गृहनियोजन