नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआयने (SBI) पुन्हा एकदा एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट) वाढवले आहे. नवीन दर 15 मे म्हणजेच रविवारपासून लागू झाले आहेत. या महिन्यात बँकेने एमसीएलआरमध्ये केलेली ही दुसरी वाढ आहे.
बँकेने प्रत्येक कार्यकाळासाठी (टेन्योर) 10 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.10 टक्के वाढ केली आहे. एसबीआयचे ओव्हरनाइट, एक महिना आणि तीन महिन्यांचा एमसीएलआर आता 6.75 टक्क्यांनी वाढून 6.85 टक्के झाला आहे. 6 महिन्यांसाठी एमसीएसलआर 7.15 टक्के, एका वर्षासाठी 7.20 टक्के, 2 वर्षांसाठी 7.40 टक्के आणि तीन वर्षांसाठी 7.50 टक्के झाला आहे.
काय होणार परिणाम?
एमसीएलआर वाढल्याने, ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाच्या मासिक ईएमआयमध्ये वाढ होईल. तसेच, नवीन ग्राहकांसाठीही कर्ज महाग होईल. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकेचा हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने 40 बेसिस पॉइंटने वाढ केली होती. दरम्यान, आरबीआय व्याजदर आणखी वाढवू शकते, ज्यामुळे बँकांकडून कर्ज घेणे अधिक महाग होईल.
बँकेचे स्टेटमेंट
एसबीआयद्वारे वितरित केलेल्या कर्जांपैकी सर्वात मोठा हिस्सा (53.1 टक्के) एमसीएलआर संबंधित कर्जांचा आहे. अलीकडेच, बँकेने 2 कोटी रुपयांच्या एफडीवरील व्याजदरात 40-90 बेस पॉइंट्सने वाढ केली होती. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी सांगितले की, या वाढीमुळे बँकेच्या मार्जिनवर सकारात्मक परिणाम होईल, कारण बहुतांश कर्जे सतत बदलणाऱ्या दरांवर आधारित असतात. याचा अर्थ रेपो दरात बदल होताच हे देखील बदलले जातील.
काय आहे एमसीएलआर?
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड आधारित कर्ज दर हा कोणत्याही वित्तीय संस्थेचा अंतर्गत बेंचमार्क किंवा संदर्भ दर असतो. हे कोणत्याही कर्जाचे किमान व्याज दर निश्चित करते. 2016 मध्ये आरबीआयने एमसीएलआरचा भारतीय वित्तीय व्यवस्थेत समावेश केला होता. यापूर्वी 2010 मध्ये लागू करण्यात आलेल्या बेस रेट सिस्टिमअंतर्गत व्याज निश्चित करण्यात आले होते. एमसीएलआर लागू झाल्यानंतर ते बंद करण्यात आले.