नवी दिल्ली – कोरोना संकटाच्या काळात कर्मचारी भविष्य निधी संघटनकडून पेन्शनधारकांना गुड न्यूज देण्यात आली आहे. आता निवृत्ताधारकांना वाढीव पेन्शन मिळणार आहे. सोमवारी ईपीएफओने बदललेली मूल्य पुनर्संचयित करण्यासाठी एकूण ९७३ कोटी जारी केले, या पेन्शनासाठी ८६८ कोटी रुपये तर थकबाकी म्हणून १०५ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत.
ईपीएफओबाबत निर्णय घेणारी संस्था केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या शिफारशीवर आधारित कामगारांची अनेक वर्षांची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे. या अंतर्गत कामगारांना १५ वर्षानंतर निवृत्तीवेतनाचे बदललेले मूल्य पूर्ववत करण्याची परवानगी देण्यात आली. आतापर्यंत पेन्शन पुनर्संचयित करण्याची कोणतीही तरतूद नव्हती त्यामुळे निवृत्तीधारकांना कमी पेन्शन मिळत असे. केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून ईपीएफओ ९५ च्या अंतर्गत पेन्शन धारकांच्या हितासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जवळपास ६५ लाख निवृत्तीधारकांना फायदा मिळणार आहे.
या कोरोना संकट काळात ईपीएफओकडून मे २०२० पासून निवृत्तीधारकांच्या बँक खात्यात वाढीव रक्कम अदा करण्यात येणार आहे. ईपीएफओ पेंशनधारकांना सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांच्या मासिक पेन्शनच्या काही रक्कम एकरकमी देण्याचा पर्याय आहे. ईपीएफओ नियमांनुसार, २६ सप्टेंबर २००८ पूर्वी निवृत्त झालेल्या निवृत्तीधारकांना पेन्शनचा एक तृतीयांश एकरकमी मिळू शकेल, तर उर्वरित दोन तृतीयांश मासिक पेन्शन म्हणून त्यांच्या हयातीत दिले जाणार आहेत. दरम्यान, केंद्रीय विश्वस्त मंडळाची गेल्या वर्षी २१ ऑगस्ट रोजी बैठक झाली होती. त्यामध्ये त्यांनी २६ सप्टेंबर २००८ पूर्वी निवृत्त झालेल्यांची पूर्ण मासिक पेन्शन १५ वर्षांनंतर पुनर्संचयित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मभारत योजनेतंर्गत कंपनी व कर्मचार्यांच्या ईपीएफचे योगदान १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली. त्यामुळे कर्मचार्यांना जास्तीचा पगार घरी नेता येईल.
फायदा कसा?
निवृत्तीच्या वेळी ५ हजार रुपये पेन्शन लागू असलेल्या कर्मचाऱ्याने जर निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेपैकी एक तृतीयांश रक्कम काढून घेतली, तर त्यांना साधारणत ३,५०० रुपयेच पेन्शन मिळत होती. १५ वर्षे ही पेन्शन घेतल्यानंतर यापुढे दर महिन्याला त्यांना मूळ रक्कम म्हणजेच पाच हजार रुपये पेन्शन मिळू शकेल.