नवी दिल्ली : देशाच्या कित्येक राज्यांत अंशत: लॉकडाऊन सुरू केल्यामुळे भारतातील शहरी भागातील बेरोजगारी वाढून जवळपास १० टक्क्यांवर गेली आहे. गेल्या वर्षीच्या कोविड-१९ लॉकडाऊननंतर अलीकडे रोजगार क्षेत्र सुधारत असल्याचे दिसत होते. काही महिन्यांच्या सुधारणेनंतर रोजगार बाजारास पुन्हा एकदा ग्रहण लागले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ११ एप्रिलला संपलेल्या आठवड्यात शहरी बेरोजगारीचा दर ९.८१ टक्के झाला. २८ मार्चला संपलेल्या आठवड्यात तो ७.७२ टक्के, तर संपूर्ण मार्चमध्ये ७.२४ टक्के होता. कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या अंशत: लॉकडाऊनचा श्रम बाजारावर कसा प्रतिकूल परिणाम होत आहे, हे अचानक वाढलेल्या आकड्यातून दिसून येत आहे. ३१ मार्च रोजी भारतातील सक्रिय कोविड-१९ रुग्णांची संख्या ७० हजार होती. ११ एप्रिल रोजी ती वाढून १,७०,००० झाली. कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, अनेक राज्यांत लॉकडाऊन आणखी कडक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुन्हा लॉकडाऊन लागल्यास श्रम बाजारात आणखी घसरण होईल. अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसेल, असे सांगण्यात येत आहे.
- सीएमआयईच्या आकडेवारीमधून असे दिसून आले आहे की, केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण बेरोजगारीतही मागील दोन आठवड्यांत वाढ झाली आहे. या काळात ग्रामीण बेरोजगारीचा दर ६.१८ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर गेला आहे. २८ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात राष्ट्रीय बेरोजगारीचा दर ६.६५ टक्के होता. ११ एप्रिलला संपलेल्या आठवड्यात तो वाढून ८.५८ टक्क्यांवर गेला.