नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर लोकांना घरातच बसण्यास सांगितलं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प पडले आहेत. अशातच लॉकडाऊन काळात तुम्हाला घरात बसून सोने खरेदी करायचं असेल तर मोदी सरकारने खास तुमच्यासाठी एक योजना आणली आहे. ११ मे म्हणजे आजपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड २०२०-२१ सीरीज २ जारी करण्यात आलं आहे.
सॉवरेन गोल्ड बॉन्डची किंमत प्रतिग्रॅम ४ हजार ५९० रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड २०२०-२१ सीरीज २ खरेदी योजना ११ मे ते १५ मे या कालावधीसाठी खुली करण्यात आली आहे. पहिल्या सीरीजमध्ये याची किंमत ४ हजार ६३९ रुपये प्रतिग्रॅम इतकी होती. मागील महिन्यात आरबीआयने सांगितले होते की, सरकार २० एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत सहा टप्प्यांमध्ये सॉवरेन गोल्ड बॉन्ड जारी करेल.
५० रुपयांची सूट
रिझर्व्ह बँक भारत सरकारच्या वतीने हा बॉन्ड जारी करेल. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून भरणा करणाऱ्या गुंतवणूकदारांना जारी केलेल्या किंमतीत प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या बाँडची किंमत प्रति ग्रॅम ४ हजार ५४० रुपये असेल.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना काय आहे?
ही योजना नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू करण्यात आली होती. याचा उद्देश फिजिकल गोल्डची मागणी कमी करणे आणि सोन्याच्या खरेदीसाठी वापरण्यात येणारी देशी बचत आर्थिक बचतीत वापरणे हा आहे. घरात सोनं खरेदी करण्याऐवजी जर तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही कर वाचवू शकता.
आपण किती सोने खरेदी करू शकता?
सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेत गुंतवणूक करणारी व्यक्ती आर्थिक वर्षात ५०० ग्रॅम पर्यंत सोन्याचे बॉन्ड खरेदी करू शकते. त्याच वेळी, किमान गुंतवणूक एक ग्रॅम आहे. कोणतीही व्यक्ती किंवा एचयूएफ आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ४ किलो सोन्याचे बॉन्ड खरेदी करू शकते. एकंदरीत, बॉन्ड खरेदी करण्यासाठी स्वतंत्रपणे मर्यादा ४ किलो आहे, तर ट्रस्ट किंवा संस्थेसाठी २० किलो निश्चित केली गेली आहे. या योजनेचा कालावधी ८ वर्षांचा आहे. मात्र त्यापूर्वी हा बॉन्ड विकायचा असेल तर कमीत कमी ५ वर्ष वाट पाहावी लागेल. या योजनेत पैसे गुंतवल्यास तुम्ही करही वाचवू शकता. योजनेतंर्गत गुंतवणुकीवर २.५ टक्के दरवर्षी व्याजदर मिळते.
असं सोनं खरेदी करा
सॉवरेन गोल्ड बॉन्डची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, काही पोस्ट ऑफिस आणि एनएसई व बीएसई मार्फत केली जाते. आपण यापैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन बॉन्ड योजनेत पैसे गुंतवणूक करु शकता. या बॉन्डची किंमत भारत बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लि. च्या ९९९ शुद्ध सोन्याच्या शेवटच्या ३ दिवसांच्या किंमतींच्या आधारे रुपयामध्ये निश्चित केली जाते.