Join us

Lockdown News: एप्रिलमध्ये प्रथमच वाहन विक्री शून्यावर; काही कंपन्यांची निर्यात सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 12:13 AM

मारुतीने मुंब्रा बंदरावरून ६३२ गाड्यांची निर्यात केली आहे. भारतातील दुसºया क्रमांकाची मोठी कंपनी ह्युंदाईने एप्रिलमध्ये १,३४१ कारची निर्यात केली आहे

नवी दिल्ली : कठोर लॉकडाउनमुळे भारतीय वाहन उत्पादक कंपन्यांची एप्रिल महिन्यातील वाहन विक्री इतिहासात पहिल्यांदाच शून्यावर आली आहे. एप्रिल २०१९ मध्ये देशांतर्गत बाजारात २,५०,००० वाहनांची विक्री झाली होती. त्यातल्या त्यात समाधानाची बाब एवढीच की बंदरांवरील कामकाज सुरू झाल्यामुळे काही वाहन कंपन्यांनी निर्यातीला पुन्हा सुरुवात केली आहे.

मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटार, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, टोयोटा किर्लोस्कर आणि एमजी मोटार यासारख्या सर्व आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांची स्थानिक विक्री शून्य राहिली. मारुतीने आपल्या नियामकीय दस्तावेजात म्हटले की, सरकारी आदेशामुळे सर्व उत्पादन प्रकल्प बंद राहिल्यामुळे एप्रिल २०२० मध्ये मारुतीची कार विक्री शून्य राहिली.

मारुती-सुझुकीसाठी वाहनांचे उत्पादन करणाऱ्या सुझुकी मोटार गुजरात प्रा.लि.ने गुजरात सरकारच्या आदेशानंतर पहिल्यांदा २३ मार्च रोजी आपली दुसरी पाळी बंद केली होती. त्यानंतर अधिकृत लॉकडाउनच सुरू झाले. तेव्हापासून उत्पादन बंदच आहे. पुनरुज्जीवनासाठी वाहन उद्योगास प्रोत्साहन पॅकेजची गरज असल्याचे मारुती-सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी अलीकडील आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते.

महिंद्र अँड महिंद्रने ७३३ गाड्यांची निर्यात केली. महिंद्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नक्रा यांनी सांगितले की, आम्ही सुटे भाग पुरवठादार, व्हेण्डर्स आणि डीलर पार्टनर्स यांच्यासोबत काम करीत आहोत. आमच्या डीलरशिप लवकरच सुरू होतील आणि काही आठवड्यात आम्ही विक्री सुरू करू शकू, अशी आम्हाला अपेक्षा आहे. टोयोटा किर्लोस्करचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवीन सोनी यांनी सांगितले की, उद्योगाची पुनर्स्थापना होण्यास वेळ लागेल. कमजोर ग्राहक धारणा आणि उद्ध्वस्त वितरण साखळी ही उद्योगापुढील आव्हाने आहेत.मारुतीची ६३२ गाड्यांची निर्यातमारुतीने मुंब्रा बंदरावरून ६३२ गाड्यांची निर्यात केली आहे. भारतातील दुसºया क्रमांकाची मोठी कंपनी ह्युंदाईने एप्रिलमध्ये १,३४१ कारची निर्यात केली आहे.आयएचएस मार्किटचे गौरव वंगाल यांनी सांगितले की, मे आणि जूनमध्ये कंपन्या ५० टक्क्यांपर्यंत उत्पादन करू शकतील. तथापि, रेड झोनमधून किती पुरवठादार पुढे येतात यावरच हे अवलंबून असेल. बीएस-६ च्या मूळ उपकरणांचा साठा किती प्रमाणात उपलब्ध आहे, यावरही उत्पादन अवलंबून राहील.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या