नवी दिल्ली : कोविड-१९ लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या विमानांच्या तिकिटांचे पैसे परत करण्यासंबंधी नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) केलेल्या शिफारशी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केल्या. त्यामुळे या काळातील हवाई तिकिटांचे पैसे प्रवाशांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तथापि, या हवाई तिकिटांचे पैसे थेट न मिळता ‘क्रेडिट शेल’मार्फत प्रवाशांना मिळतील.
लॉकडाऊन काळात प्रवास करण्यासाठी २५ मार्च २०२० आणि २४ मे २०२० यादरम्यान बुक करण्यात आलेल्या हवाई तिकिटांचे संपूर्ण पैसे प्रवाशांना या शिफारशींंन्वये परत मिळतील. विमान वाहतूक कंपन्यांना त्यावर निरसन शुल्क (कॅन्सलेशन चार्जेस्) लावता येणार नाहीत. एरवी निरसन शुल्काच्या नावाखाली बुक झालेल्या तिकिटातील ठरावीक रक्कम विमान वाहतूक कंपन्या कापून घेत असतात. तिकीट रद्द केल्यापासून तीन आठवड्यांच्या आत प्रवाशास पैसे मिळतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी बुक केलेल्या तिकिटांचे पैसेही प्रवाशांना परत मिळतील. भारतीय विमान कंपन्यांचे तिकीट भारताबाहेर बुक केले असले तरीही आंतरराष्ट्रीय तिकिटांचे पैसे परत मिळतील.
एजंटांमार्फत मिळणार परतावा
च्सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, प्रवाशांनी तिकीट केव्हाही बुक केलेले असेल. मात्र, प्रवास २४ मे २0२0 नंतरचा असेल, तर अशा तिकिटांच्या परताव्यासाठी ‘नागरी उड्डयन अनिवार्यता’मधील (सीएआर) तरतुदी लागू होतील. ट्रॅव्हल एजंटांमार्फत लॉकडाऊन काळात बुक करण्यात आलेल्या तिकिटांचे पैसे विमान वाहतूक कंपन्यांकडून ताबडतोब एजंटांना दिले जातील. एजंटांकडून ते प्रवाशांना मिळतील.