नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातलं मतदान संपताच पेट्रोल, डिझेलचे दर भडकण्याची शक्यता आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या दरात 9 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचा दर लीटरमागे 16 पैशांनी वधारला. देशाच्या राजधानीतही इंधन दर वाढले आहेत. गेले दोन महिने इंधनाच्या दरात फारशी वाढ झाली नव्हती. गेल्या 15 दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर घरसत होते. मात्र काल शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपताच आज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोल, डिझेल दरात झालेली वाढ नियमित स्वरुपाची असून त्यात काहीच चुकीचं नसल्याचं सरकारी इंधन कंपन्यांनी सांगितलं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या काळात सरकारनं कंपन्यांना इंधन दर स्थिर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या काही दिवसात इंधन कंपन्यांनी फारशी वाढ केलेली नव्हती. या काळात झालेलं नुकसान आता भरुन काढण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात इंधनाचे दर भडकतील, अशी दाट शक्यता आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.
मतदान संपताच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 16:03 IST