Zerodha Kite App Nithin Kamath : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएला २९२ जागा मिळाल्या असून, त्यापैकी एकट्या भाजपनं २४० जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसप्रणित इंडीया आघाडीला २३३ जागा मिळाल्या. काँग्रेसनं यात ९९ जागा जिंकल्या आहेत. निवडणूक निकाल २०२४ च्या दिवशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात भरपूर पैसे गुंतवले होते, परंतु मंगळवारच्या व्यवसायात मोठी घसरण नोंदवली गेली आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांचं अनेक लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
Kite App वर ८ हजार कोटी जमा
दरम्यान, ब्रोकरेज फर्म झिरोदाचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. गुंतवणूकदारांनी झिरोदाच्या काईट अॅपमध्ये ८,००० कोटी रुपये जमा केले होते अशी माहिती त्यांनी दिली. कामत यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल एक्सवर डेटा चार्टही शेअर केला.
कामत यांनी पोस्ट केलेल्या चार्टनुसार, ट्रेडिंग अॅप काइटवर ४ जून रोजी ३४.५ दशलक्ष ऑर्डर बुक झाल्या होत्या. याशिवाय ८० लाखांहून अधिक लोकांनी अॅपवर लॉग इन केलं होतं. तर १० लाखांहून अधिक जीटीटी सुरू करण्यात आले.
सेन्सेक्स मंगळवारी ६००० अंकांनी घसरला
निवडणुकीच्या कलांमध्ये इंडीया आघाडीला आघाडी मिळाल्यानंतर मंगळवारी बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं होतं. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये ६ हजार अंकांची घसरण नोंदवण्यात आली, तर निफ्टीमध्ये २ हजार अंकांची घसरण नोंदवण्यात आली. ही घसरण गेल्या चार वर्षांतील सर्वात मोठी घसरण असून एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे ३० लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. अदानी आणि रिलायन्ससह अनेक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला.
त्याचबरोबर देशातील अदानी समूह आणि रिलायन्ससह देशातील अनेक आघाडीच्या कंपन्यांचे मोठं नुकसान झालं होतं. बाजारातील लोअर सर्किटनंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स जवळपास १८ टक्क्यांनी घसरले. तर रिलायन्सच्या शेअरमध्ये १० टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
मंगळवारी घसरणीसह बाजार बंद
मंगळवारी शेवटच्या सत्रात सेन्सेक्स ४,३८९ अंकांनी म्हणजेच ५.७४ टक्क्यांनी घसरून ७२,०७९ वर, तर निफ्टी १,३७९ अंकांनी म्हणजेच ५.९३ टक्क्यांनी घसरून २१,८८४ वर बंद झाला. याशिवाय निफ्टी ४,०५१ अंकांनी म्हणजेच ७.९५ टक्क्यांनी घसरून ४६,९२८ वर बंद झाला.