मुंबई : समाजामुळेच आपण आपले कार्य यशस्वीरीत्या करत आहोत, ही जाणीव असणे फार महत्वाचे असते. ही जाणीव असली की समाजाला आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना आपसूकच मनात येते आणि त्यादृष्टीने कामालाही सुरुवात होते. टाटा मोटर्स, ही खरेतर मोठी कॉर्पोरेट कंपनी. पण या कंपनीचा फक्त पैसा कमावण्याचा अट्टहास नाही तर समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आरोग्य, शिक्षण, रोजगाराच्या संधी आणि पर्यावरण या क्षेत्रांमध्ये मोलाचे कार्य केले आहे. आतापर्यंत तब्बल ६,४४,००० लोकांना त्यांच्या विविध योजनांचा फायदा झाला आहे. त्यामुळेच लोकमत 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने टाटा मोटर्स (मुंबई) यांचा सन्मान करण्यात येत आहे. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात टाटा मोटर्सला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमत 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कारामध्ये सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलीटी) असा एक विभाग ठेवण्यात आला होता. या विभागामध्ये टाटा मोटर्स या कंपनीने बाजी मारली आहे. आपल्या प्रकल्पालगत राहणाऱ्या गरीब आणि दुर्बल घटकांचं जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणं हे टाटा मोटर्सचं ध्येय आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगाराच्या संधी आणि पर्यावरण या विषयांकडे त्यांचं विशेष लक्ष असून ६,४४,००० जणांना त्यांच्या विविध योजना-प्रकल्पांचा फायदा होत आहे. शाश्वत विकासासाठी टाटा मोटर्स कटिबद्ध असून व्यवसाय, समाजहित आणि पर्यावरण रक्षण हातात हात घालून वाटचाल करू शकतं, हे त्यांनी सिद्ध केलं आहे.
हे होतं परीक्षक मंडळ
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.