लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागण्याची शक्यता आहे. पुनर्विकासित रेल्वेस्थानकांवरून रेल्वेगाड्यांमध्ये चढणे किंवा उतरण्यावर विकास शुल्क आकारण्याचा विचार रेल्वे मंत्रालयाकडून सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील रानी कमलापती आणि गांधीनगर रेल्वेस्थानकाचा विकास करण्यात आला. अशा प्रकारे आणखी काही स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या स्थानकांवरून तिकीट बुकिंग करतानाच प्रवासभाड्यात या शुल्काचा समावेश केला जाऊ शकताे.
रेल्वे मंडळानेही याबाबत एक पत्र जारी केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे शुल्क तीन श्रेणींमध्ये विभागण्यात येईल. सर्व एसी क्लासेससाठी ५० रुपये, स्लीपर क्लाससाठी २५ रुपये तर अनारक्षित आणि द्वितिय श्रेणीसाठी १० रुपये शुल्क राहील. यातून उपनगरीय रेल्वे प्रवास वगळण्यात येणार आहे. त्यानुसार पुनर्विकासित स्थानकांवर प्लॅटफाॅर्म तिकीटही १० रुपयांनी महाग असेल.
रेल्वेचा महसूल वाढेलस्थानक विकास शुल्क आकारल्यामुळे रेल्वेचा महसूलही वाढेल. तसेच हे माॅडेल रेल्वेसाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्यही राहील. तसे झाल्यास खासगी क्षेत्र याकडे आकर्षिक हाेईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.