नवी दिल्ली - कच्च्या तेलाचे दर घटल्यामुळे पेट्राेल आणि डिझेलची दरकपात कधी हाेणार, याची सर्वसामान्य जनतेला प्रतीक्षा आहे. मात्र, सरकारने दरकपातीसाठी एक अट ठेवली आहे. कच्च्या तेलाचे दर दीर्घ कालावधीसाठी कमी राहिल्यास तेल कंपन्या पेट्राेल-डिझेलचे दर कमी करू शकतात. पेट्राेलियम सचिव पंकज जैन यांनी यासंदर्भात माहिती दिली.
तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पेट्राेल-डिझेलचे दर प्रति लीटर २-२ रुपयांनी कमी हाेऊ शकतात. यासंदर्भात जैन यांनी सांगितले की, कच्च्या तेलाचे दर घटले आहेत. मात्र, केवळ आठवडाभराच्या स्थितीवर निर्णय घेता येणार नाही. सध्या घटलेले दर काही कालावधीसाठी कायम राहिल्यास इंधन दरकपातीचा विचार हाेऊ शकताे. ८२,५०० काेटी रुपये एवढा नफा तेल कंपन्यांनी गेल्या आर्थिक वर्षात कमाविला. ७१ पट जास्त हा नफा आहे २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत.
उत्पादनवाढीवर भारताची नजर
जैन यांनी सांगितले की, ओपेक देश ऑक्टाेबर-नाेव्हेंबरमध्ये उत्पादन वाढविणार हाेते. मात्र, दाेन महिन्यांनंतर साधारणत: डिसेंबरनंतर उत्पादन वाढीवर निर्णय घेतील. उत्पादन वाढावावे, ही भारताची इच्छा आहे. उत्पादन वाढविल्यास आम्ही स्वागतच करू.
कच्च्या तेलाचा नीचांक
मंगळवारी ब्रेंट क्रूड तेलाची किंमत ७० डाॅलर प्रतिबॅरलपेक्षा कमी हाेती. डिसेंबर २०२१नंतर प्रथमच हे दर या पातळीवर आले. टेक्सास क्रूडचे दरदेखील ६६ ते ६८ डाॅलर प्रतिबॅरलच्या आसपास आहेत. यात गुरुवारी किंचित वाढ झाली आहे. १३ ते १४ रुपये प्रतिलिटर एवढा नफा सध्या तेल कंपन्या पेट्राेल-डिझेलच्या विक्रीतून कमावत आहेत. त्यात आणखी वाढ हाेणार आहे.
ब्रेंट क्रूडचे दर (डाॅलर प्रति बॅरल)
९ एप्रिल २०२४ ९०.६०
४ जून २०२४ ७७.५०
४ जुलै २०२४ ८७.४०
४ सप्टेंबर २०२४ ७२.९१
११ सप्टेंबर २०२४ ७०.१३