नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या अडचणीत भर पडताना दिसत आहे. सीबीआयने चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे कार्यकारी संचालक वेणुगोपाल धूत यांच्या विरुद्ध लुक आउट सर्क्युलर (एलओसी) जारी केले आहे. २००९ ते २०११ या काळात व्हिडिओकॉन ग्रुपला बँकेने सहा कर्जाच्या माध्यमातून १,८७५ कोटी रुपये दिले होते. यात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध गुन्हादाखल करण्यात आला होता. लुक आउट सर्क्युलर जारी झाल्यानंतर हे तिघे आता देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, सीबीआयने गतवर्षी प्रीलिमनरी इन्क्वायरी (प्राथमिक चौकशी) फाइल केल्यानंतर दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध सर्व विमानतळांना लुकआउट सर्क्युलरची माहिती देण्यात आली होती. आता त्याला रिव्हाइव (पुनुरुज्जीवित) करण्यात आले आहे. अर्थात, चंदा कोचर यांच्याविरुद्ध प्रथमच लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. सीबीआयकडून २२ जानेवारी रोजी दाखल एफआयआरमध्ये त्यांचे नाव होते. त्यामुळे त्यांना याच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
या वृत्ताबाबत चंदा कोचर आणि वेणुगोपला धूत यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. एका अधिकाºयाने सांगितले की, एफआयआरनंतर लुक आउट नोटीस दिली होती. ज्या पद्धतीने आर्थिक बाबतीत आरोप आहेत त्यात लुकआउट जारी होणे अनिवार्य आहे. आरोपींच्या प्रवासावर लक्ष ठेवणे हे नियमावलीतच आहे.
या प्रकरणाशी संबंधित एका ज्येष्ठ वकीलांनी सांगितले की, सीबीआयला लुक आउट जारी करण्याची गरज नव्हती. कारण, चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ आहेत. यापूर्वी जे लोक आर्थिक गुन्ह्याच्या आरोपात फरार आहेत त्यांच्यासोबत चंदा कोचर यांचे नाव जोडणे योग्य नाही. आर्थिक वर्तुळात त्या मान्यवर व्यक्ती आहेत. त्यांच्याविरुद्ध जे आरोप आहेत त्यातील एकही अद्याप सिद्ध झालेला नाही. गत वर्षभरात नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहुल चोकसी यांच्यासारखे आरोपी देशाबाहेर फरार झाले आहेत.
पुन्हा लवकरच चौकशी
या प्रकरणात ईडीकडून चंदा कोचर आणि दीपक कोचर यांची लवकरच चौकशी केली जाऊ शकते. दीपक कोचर यांच्या व्हिडिओकॉन ग्रुपबरोबरच्या संबंधाबाबतही ईडी चौकशी करु शकते. कोचर दाम्पत्याच्या संपत्तीचीही ईडीला चौकशी करायची आहे. यात त्यांच्या साउथ मुंबईतील अपार्टमेंटचा समावेश आहे.