los angeles wildfire : अमेरिकेने आतापर्यंत अनेक नैसर्गिक संकटांना तोंड दिले. अतिवृष्टी, महापूर ते त्सुनामी अशी अनेक संकटे या देशाने परतावून लावली. चक्रीवादळ तर त्यांच्या पाचवीलाच पुजलं आहे. पण, यावेळी घडलेली घटना देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी सांगितली जात आहे. यामध्ये जीवितहानीपेक्षा वित्तीहानी मोठी आहे. या संकटाचा तडाखा महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. आधीच मंदीमुळे थंडावलेल्या अर्थव्यस्था यामुळे गुडघ्यावर येण्याची शक्यता आहे. यातून बाहेर काढण्याचं मोठं आव्हान आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर असणार आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस आपल्या इतिहासातील सर्वात भीषण आगीशी झुंज देत आहे. या आगीत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून शेकडो घरे जळून खाक झाली आहेत. यामध्ये अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींच्या आलिशान घरांचाही समावेश आहे. एका अंदाजानुसार, अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात भीषण आग आहे, ज्यामुळे १३५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. या आगीमुळे १३५ अब्ज ते १५० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज अमेरिकेतील खासगी हवामान माहिती कंपनी AccuWeather ने व्यक्त केला आहे. ही आग लवकर आटोक्यात आणली नाही तर आणखी नुकसान होऊ शकते, असेही त्यांचे म्हणणे आहे.
AccuWeather चे मुख्य हवामानशास्त्रज्ञ जोनाथन पोर्टर म्हणाले की, ही आग लवकर आटोक्यात आणली नाही तर ही कॅलिफोर्नियाच्या इतिहासातील सर्वात भीषण आग ठरू शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, २०२३ मध्ये माउईमध्ये जंगलात लागलेल्या आगीमुळे १६ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. दरम्यान जे. पी. मॉर्गन म्हणाले की लॉस एंजेलिसमधील आगीमुळे सुमारे १० अब्ज डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. यामध्ये सर्वाधिक नुकसान घरमालकांचा होणार आहे. त्या तुलनेत व्यावसायिक तोटा फारसा होणार नाही. या आगीमुळे १०,००० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
अमेरिकेचे कर्जलॉस एंजेलिस आणि रिव्हरसाइड मेट्रो क्षेत्रातील ४५६,००० हून अधिक घरांना आगीमुळे नुकसान होऊ शकते असा मालमत्ता सल्लागार CoreLogic चा अंदाज आहे. ही घरे बांधण्यासाठी सुमारे ३००० अब्ज डॉलर्सचा खर्च येऊ शकतो. कर्जबाजारी झालेल्या अमेरिकेसाठी ही परिस्थिती चांगली नाही. अमेरिकेचे कर्ज ३६ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे, जे त्यांच्या GDP च्या १२५% आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की अमेरिकेला व्याजाच्या पेमेंटसाठी दररोज सुमारे २ अब्ज डॉलर खर्च करावे लागतात. पुढील दशकापर्यंत देशाचे कर्ज ५४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.