Join us

सरकारी बँकांचा तोटा ८७,००० कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:22 AM

एनपीए ८.३१ लाख कोटी रुपयांवर गेल्याने त्यापोटी कराव्या लागणाऱ्या भरमसाट तरतुदींमुळे सरकारी बँकांच्या तोट्याने ८७,००० कोटी अशी विक्रमी पातळी गाठली आहे. २१ पैकी दोनच बँका २०१७-१८ मध्ये नफ्यात आहेत.

मुंबई  - एनपीए ८.३१ लाख कोटी रुपयांवर गेल्याने त्यापोटी कराव्या लागणाऱ्या भरमसाट तरतुदींमुळे सरकारी बँकांच्या तोट्याने ८७,००० कोटी अशी विक्रमी पातळी गाठली आहे. २१ पैकी दोनच बँका २०१७-१८ मध्ये नफ्यात आहेत.सरकारी बँकांवरील संकटांसंबंधी हंगामी वित्तमंत्री पीयूष गोयल यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत तातडीची बैठक घेतली. कर्जांच्या ओझ्यातून बँकांना बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.नीरव मोदी प्रकरणाने बँकिंग क्षेत्र हादरले आहे. या घोटाळ्यामुळेच पंजाब नॅशनल बँकेला २०१७-१८ मध्ये विक्रमी १२,२८२ कोटींचा तोटा झाला. आयडीबीआयला सर्वाधिक ८२३७ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यांच्या तोट्यात जवळपास ३२०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.देशातील २१ बँकांचे मालक केंद्र सरकार आहे. या बँकांनी २०१६-१७ मध्ये एकत्रितपणे ४७३.७२ कोटींचा नफा कमावला होता. यंदा १९ बँकांना एकत्रितपणे ८७,३५७ कोटी रुपयांचा तोटा झाला. केवळ इंडियन बँकेला १२५८.९९ कोटी व विजया बँकेला ७२७.०२ कोटींचा नफा झाला.विलीनीकरणामुळे स्टेट बँक संकटातदेशातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेत सहा उप बँकांचे विलीनीकरण करण्यात आले. त्यामुळे स्टेट बँकेसारखी देशाच्या तळागाळात पोहोचलेली ही बँक संकटात आली आहे. २०१६-१७ मध्ये १०,४८४ कोटी रुपयांचा नफा असताना वर्षभरातच बँक ६,५४७ कोटी रुपयांनी तोट्यात गेली. उद्योजकांनी बुडवलेल्या कर्जांपोटीच्या तरतुदीमुळेच बँकेवर ही वेळ आली आहे.

टॅग्स :बँकअर्थव्यवस्था