अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते. हे स्थान मिळवणारे ते आशियातील पहिले व्यक्ती ठरले. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती १५० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होती. पण या वर्षी जानेवारीत आलेल्या एका अहवालानं त्यांना इतका मोठा धक्का दिला की ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप २० मधून बाहेर गेले. यावर्षी सर्वाधिक संपत्ती गमावण्याच्या बाबतीत अदानी पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या नेटवर्थमध्ये यावर्षी जेवढी वाढ झाली आहे तेवढीच रक्कम अदानींनी गमावली आहे.
अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चनं २४ जानेवारी रोजी अदानी समूहाविरोधात अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये अदानी समूहावर शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. अदानी समूहानं हे आरोप फेटाळून लावले असले तरी त्यामुळे समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.बुधवारी, अदानींची एकूण संपत्ती १.४९ अब्ज डॉलर्सनं घसरली आणि ५८.७ अब्ज डॉलर्स झाली. अदानींच्या एकूण संपत्तीत यावर्षी ६१.८ अब्ज डॉलरची घट झाली आहे. म्हणजे अदानींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जेवढं कमावलं आहे त्यापेक्षा जास्त तोटा त्यांना या वर्षी झाला. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी सध्या २२ व्या क्रमांकावर आहेत.यावर्षी कमाईच झुकेरबर्ग पहिल्या क्रमांकावरफेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्सचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यावर्षी सर्वाधिक कमाईच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहेत. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती ६७.४ अब्ज डॉलर्सनं वाढली आहे आणि ११३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते नवव्या स्थानावर आहेत. १९८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मस्क या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. Amazon चे संस्थापक जेफ बेझोस १६० अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आले आहेत, तर फ्रान्सचे जोसेफ अर्नॉल्ट तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी ८५.७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ११ व्या क्रमांकावर आहेत.