नवी दिल्ली : १ एप्रिलपासून नवी कर रचना लागू हाेणार आहे. त्यानुसार ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. सरकारने आता वित्त विधेयकात एक दुरुस्ती करून नव्या नियमानुसार, सात लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना केवळ अतिरिक्त उत्पन्नावरच कर द्यावा लागेल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात नव्या कर रचनेतील बदल जाहीर केले. मात्र, त्यातील काही तरतुदींबाबत संभ्रम हाेता. त्यासंदर्भात लाेकसभेत नुकतेच मंजूर झालेल्या वित्त विधेयकात काही दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यातून करदात्यांना एक माेठा दिलासा दिला आहे.
सात लाख रुपयांपेक्षा काही प्रमाणात उत्पन्न जास्त असल्यास तेवढ्याच अतिरिक्त उत्पन्नावर कर द्यावा लागेल. अतिरिक्त उत्पन्नाची मर्यादा किती, हे सरकारने स्पष्ट केलेले नाही. मात्र, ७ लाख २७ हजार ७७७ रुपये उत्पन्न असलेल्यांना या तरतुदीचा लाभ मिळू शकताे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.