अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डे हा जगभर प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. माणसाच्या जीवनात प्रेमाला अनन्य महत्त्व आहे. प्रेम माणसांवर, वस्तूंवर व पैशावर केले जाते. परंतु या पैशावरील प्रेमामुळे नोटाबंदीसारख्या अनेक समस्या निर्माण होतात व त्यामुळेच कर चुकविणारा समाज तयार झाला आहे. याविषयी सविस्तर माहिती सांग.कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, प्रेम हे जीवनाचे मूळ आहे. व्यक्ती कमवितो नातेवाइकांसाठी. कारण प्रेमासाठी पैसा असतो, पैशासाठी प्रेम नव्हे. आजकाल प्रत्येक जण पैशाच्या मागे लागला आहे. त्यामुळे अनेकांचा प्रयत्न असतो की कर कसा कमी भरला जाईल. आपल्या देशात लोकसंख्या एवढी आहे; परंतु कर भरणारे तुटपुंजे आहेत. त्यामुळे या तुटपुंज्या लोकांवर कर भरण्याचा जास्त भार येतो.अर्जुन : कृष्णा, अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी या कर चुकविणाऱ्या समाजाबद्दल काय सांगितले?कृष्ण : अर्जुना, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष कराचे संकलन, उत्पन्न व त्याच्या वापराच्या बरोबरीने नाही. हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी काही आकडेवारी मांडली. जसे ४.२ कोटी नोकरी करणाऱ्यांपैकी फक्त १.७४ कोटी लोक आयकर रीटर्न दाखल करतात. तसेच लहान व्यवसाय करणाऱ्या अनौपचारिक क्षेत्रातील ५.६ कोटी लोकांपैकी १.८१ कोटी लोक आयकर रीटर्न दाखल करतात. १३.९४ लाख नोंदणीकृत कंपन्यांपैकी ५.९७ लाख कंपन्यानी त्यांचे आयकर रीटर्न दाखल केले आहेत. तसेच त्यापैकी २.७६ लाख कंपन्यांनी उत्पन्न नाही किंवा तोटा आहे असे दर्शविले. हा आढावा आयकर रीटर्न दाखल केलेल्यांचा आहे. यामधून असे स्पष्ट झाले होते की, अनेक उत्पन्न कमविणारे कर भरत नाहीत व रीटर्न दाखल करीत नाहीत. कर भरणाऱ्यांचा जर आढावा घेतला तर वर्ष २०१५-१६चे रीटर्न दाखल करणाऱ्या ३.७ कोटी लोकांपैकी ९९ लाख लोकांनी उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी म्हणजेच २०५ लाखांपेक्षा कमी दर्शविले तर १.९५ लाख लोकांनी २.५ लाख ते ५ लाखांपर्यंत दर्शविले. तसेच ५२ लाख लोकांनी उत्पन्न ५ ते १० लाखांपर्यंत दर्शविले व २४ लाख लोकांनी उत्पन्न १० लाखांच्या वर दर्शविले. फक्त १.७२ लाख लोकांनी उत्पन्न ५० लाखांच्या वर दर्शविले. मागील पाच वर्षांत १.२५ कोटी कार विकल्या गेल्या व २०१५मध्ये २ कोटी लोक विदेशात पर्यटनासाठी किंवा व्यवसायिक कारणासाठी गेले. याचा अर्थ पैशाच्या प्रेमापायी लोक कर कमी आणि मौजमजेवर जास्त खर्च करतात.अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, देशाच्या प्रेमापायी नोटाबंदीची झळ लोकांनी सोसली व पैशाचे प्रेम कमी करून देशाला सहकार्य केले. आता प्रत्येक भारतीय नागरिकाने पैशावरील प्रेम कर भरून व्यक्त करावे. तसेच शासकीय अधिकारी, राजकीय पक्ष, इत्यादींनीसुद्धा पैशावरील प्रेम कमी करून देशप्रेमाद्वारे आपले कर्तव्य बजावून देशाच्या उन्नतीसाठी पैसा खर्च कराचा, जो कराद्वारे भरला जातो. कर चुकविणाऱ्यांनी पैशावरील प्रेम कमी करून, कर भरल्याने देशात कर चुकविणारा समाज राहणार नाही.
पैशांवरील प्रेम आणि कर चुकविणारा समाज
By admin | Published: February 13, 2017 12:22 AM