मुंबई : रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या धोरणात्मक व्याजदरांत ३५ आधार अंकांची कपात केली असून, त्यामुळे येत्या काळात गृह, वाहन कर्जे स्वस्त होणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने लगेल व्याजदर घटविले आहेत. रिझर्व्ह बँकेने केलेली ही सलग चौथ्या पतधोरण आढाव्यातील कपात ठरली आहे. धोरणात्मक व्याजदर आता ९ वर्षांच्या नीचांकीवर गेला आहे.
रिझर्व्ह बँकेने या वित्त वर्षातील तिसरा पतधोरण आढावा बुधवारी जाहीर केला. देशाची अर्थव्यवस्था मंदावली असून, वृद्धीदर ५ वर्षांच्या नीचांकीवर आहे. तिला गती देण्यास दर कपातीचा निर्णय घेण्यात आला. या वर्षात आतापर्यंत रेपोदरात १.१ टक्क्याची कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेकडून व्यावसायिक बँकांना कर्ज देताना जो व्याजदर लावला जातो, त्यास रेपोदर असे म्हटले जाते. रेपोदरातील कपातीचा आजचा निर्णय सहा सदस्यीय पतधोरण समितीने बहुमताच्या आधारे घेतला. चार सदस्यांनी रेपोदरात ३५ आधार अंकांची कपात करण्याच्या बाजूने मत दिले. दोन सदस्यांनी २५ आधार अंकांची कपात करण्याच्या बाजूने मत मांडले. पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँकेने देशाचा २०१९-२० या वित्त वर्षाचा वृद्धीदर अंदाज किंचित कमी करून ६.९ टक्के केल. जूनच्या पतधोरण आढाव्यात तो ७ टक्के होता.
रिझर्व्ह बँकेने म्हटले की, मागणी व गुंतवणुकीतील मंदीमुळे जीडीपीच्या वृद्धीदर अंदाजात कपात करण्यात येत आहे. २०१९-२० या वित्त वर्षासाठी सकळ राष्ट्रीय उत्पन्नाचा वास्तविक वृद्धीदर जूनमधील ७ टक्क्यांवरून ६.९ टक्के अनुमानित करण्यात आला आहे. वृद्धीदर वित्त वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ५.८ ते ६.६ टक्के राहील, तर दुसऱ्या सहामाहीत ७.३ ते ७.५ टक्के राहील, असा अंदाज आहे. अंदाजात केलेली कपात घसरणीच्या जोखिमेसह मात्र नाही.
२५ आधार अंकांची कपात अपुरी असून, ५0 आधार अंकांची कपात जास्त ठरेल, असे मत पतधोरण समितीने व्यक्त केले. त्यानुसार, संतुलन साधून ३५ आधार अंकांची कपात करण्यात आली आहे. आर्थिक आकडेवारी लक्षात घेऊन ही कपात करण्यात आली.
- शक्तिकांत दास, गव्हर्नर
व्याजदरात कपात केल्याने कर्जे होणार स्वस्त
रिझर्व्ह बँकेने सलग चौथ्यांदा घेतला निर्णय; रेपोदरात केली ३५ आधार अंकांची कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 02:10 AM2019-08-08T02:10:51+5:302019-08-08T06:18:07+5:30