Join us

LPG CNG Prices : 1 सप्टेंबरपासून एलपीजी-सीएनजीच्या दरात होणार बदल; कशी ठरवली जाते किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 1:47 PM

LPG CNG Prices : ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेला तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत (19 किलो) 36 रुपयांनी कमी केली होती. याचा थेट फायदा घरगुती एलपीजी ग्राहकांना झाला नाही.

नवी दिल्ली : दर महिन्याच्या सुरुवातीला इंधन कंपन्या उत्पादनांचे नवीन दर जाहीर करतात. कंपन्या कधी किमती वाढवतात तर कधी कमी करतात. ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेला तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत (19 किलो) 36 रुपयांनी कमी केली होती. याचा थेट फायदा घरगुती एलपीजी ग्राहकांना झाला नाही. सध्या दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1,053 रुपये आहे. 

दरम्यान, जुलैमध्ये सिलिंडरची किंमत दिल्लीत समान होती. एलपीजीची किंमत कच्च्या तेलाच्या किंमतीसह इतर अनेक घटकांवर अवलंबून असते. सीएनजीचीही तीच स्थिती आहे. सीएनजीच्या प्रचंड वाढीमुळे वाहनचालकांचे बजेट पूर्णपणे कोलमडले होते. किमती इतक्या वाढल्या की, टॅक्सी सेवांना त्यांचे किमान भाडे वाढवावे लागले आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरही बोजा पडला. दिल्लीत सध्या प्रति किलो सीएनजीची किंमत 75.61 रुपये (आयजीएल), रुपये 80 (एमजीएल) आणि 83.9 रुपये (अदानी गॅस) आहे.

सप्टेंबरमध्ये किंमत वाढणार का?एलपीजी आणि सीएनजीच्या किमती अनेक घटकांवर अवलंबून असतात. त्यातील सर्वात मोठा घटक म्हणजे कच्च्या तेलाची किंमत. ब्रेंट क्रूडच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली असून सध्या ते प्रति बॅरल 99.80 डॉलरवर पोहोचले आहे. मात्र, ते अजूनही सुमारे 100 डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे तेल विपणन कंपन्यांकडून दर कमी करण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. गेल्या 2 महिन्यांपासून घरगुती एलपीजीच्या किमतींमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. त्यामुळे त्यात थोडीशी वाढ होऊ शकते. सीएनजीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या काही महिन्यांपासून कंपन्यांनी सतत त्याच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये आता घट किंवा वाढ दोन्हीची शक्यता कमी आहे. सीएनजीचे दर याच पातळीवर राहण्याची शक्यता आहे.

कशी ठरवली जाते किंमत?एलपीजीची किंमत ठरवण्यासाठी आयात समता मूल्य सूत्र वापरला जातो. यामध्ये कच्च्या तेलाची किंमत, सागरी मालवाहतूक, विमा, कस्टम ड्युटी, बंदर खर्च, डॉलर ते रुपया विनिमय, मालवाहतूक, तेल कंपनी मार्जिन, बॉटलिंग खर्च, विपणन खर्च, डीलर कमिशन आणि जीएसटी यांचा समावेश आहे. जवळपास समान घटक सीएनजीच्या किमतींवर देखील परिणाम करतात. यातील महत्त्वाचा फरक म्हणजे सीएनजी कच्च्या तेलापासून बनत नाही तर नैसर्गिक वायूपासून बनते. त्यामुळे नैसर्गिक वायूचा परिणाम सीएनजीच्या दरांवर होत आहे. भारत त्याच्या निम्म्याहून अधिक नैसर्गिक वायूची आयात करतो.

टॅग्स :गॅस सिलेंडरव्यवसाय