Join us

महागाईचा झटका! महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडर महागला, आता इतकी झाली किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 8:29 AM

LPG Cylinder Price: मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशीच इंधन कंपन्यांचा मोठा झटका दिला आहे.

LPG Cylinder Price: मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशीच इंधन कंपन्यांचा मोठा झटका दिला आहे. पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आलीये. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर दिल्लीत २५.५० रुपयांनी तर मुंबईत २६ रुपयांनी महागलाय. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करून जोरदार झटका दिलाय. तर १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात म्हणजे १ फेब्रुवारी रोजी सिलिंडरच्या किंमतीत १४ रुपयांनी वाढ झाली होती. 

आता किती झाले दर?

 

किमतीत वाढ झाल्यानंतर आता दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १,७९५ रुपये झाली आहे. यापूर्वी याची किंमत १,७६९.५० रुपये होती. दिल्लीत एलपीजी सिलिंडरच्या किंमती २५.५० रुपयांनी वाढलीये. मुंबईत १९ किलोच्या सिलिंडरची किंमत आता १७२३.५० रुपयांवरून वाढून १७४९ रुपयांवर पोहोचली. तर कोलकात्यात १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १९११ रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी याची किंमत १८८७ रुपये होती. चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडर सर्वात महाग झाला आहे. आता चेन्नईत याची किंमत १९३७ रुपयांवरून १९६०.५० रुपये झालीये. 

घरगुती सिलिंडरच्या किंमतीत वाढ नाही 

घरगुती एलपीजी सिलिंडर म्हणजेच १४ किलोच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. घरगुती एलपीजी सिलिंडरबद्दल बोलायचं झालं तर, त्यात अखेरचा बदल गेल्या वर्षी ३० ऑगस्ट रोजी झाला होता. तेव्हापासून १४ किलोच्या सिलिंडरची किंमत स्थिर आहे. सध्या दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर ९०३ रुपयांना उपलब्ध आहे. तर मुंबईत याची किंमत ९०२.५० रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपये आहे.

टॅग्स :गॅस सिलेंडर