नवी दिल्ली- दिवाळीच्या काही दिवसांआधीच अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. अनुदानित घरगुती सिलिंडरच्या किमतीत 2.94 रुपयांची वाढ केली. त्यामुळे सिलिंडरवरच्या करामुळे या किमती वाढल्या असून, आधार मूल्यातही बदल होणार आहे. अनुदानित घरगुती सिलिंडरचे किंमत जूनपासून आतापर्यंत सहाव्यांदा वाढली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या सिलिंडरच्या किमतीत 14.13 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.
इंडियन ऑईल कॉर्प(आईओसी)च्या मते, 14.2 किलोच्या अनुदानित प्रति एलजीपी सिलिंडरचा भाव बुधवारी मध्यरात्रीपासून वाढून 502.40 रुपयांवरून 505.34 रुपयांवर पोहोचला आहे. तर विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ होऊन ती प्रति सिलिंडर 880 रुपयांवर गेली आहे. जागतिक किमतीतील वाढ आणि रुपयाची बिघडत असलेल्या स्थितीमुळे विनाअनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत 60 रुपयांनी वाढली आहे. तर अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना जीएसटीमुळे 2.94 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. अनुदानित ग्राहकांना सरकार वर्षाला 14.2 किलोचे 12 सिलिंडर उपलब्ध करून देते. अनुदानाची ही रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅसच्या किमतीत होत असलेली वाढ याला कारणीभूत आहे. भारतातील गॅस सिलिंडरच्या किमती त्यानुसार ठरतात. गृहिणींना धुरापासून सुटका मिळावी म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना गरिबांसाठी लागू केली. सरकारने गृहिणीच्या नावाने गॅस सिलिंडर कनेक्शन आणि शेगडी दिली. पण आता सिलिंडरची किंमत वाढल्यामुळे गरिबांना वाढीव दरात सिलिंडरची खरेदी आवाक्याबाहेर झाली आहे. अनेक राज्यांमध्ये गॅसचा उपयोग कमी होऊन पुन्हा लाकडांवर स्वयंपाक करणे सुरू झाले आहे. सिलिंडरची दर महिन्याला वाढणारी किंमत गरिबांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.
LPG सिलिंडर महागला, पाच महिन्यांत सहाव्यांदा वाढ
दिवाळीच्या काही दिवसांआधीच अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 08:12 AM2018-11-01T08:12:18+5:302018-11-01T08:17:51+5:30