Join us

LPG Cylinder Price Hike: आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवी किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 10:12 AM

यापूर्वी मे महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात घट करण्यात आली होती.

ठळक मुद्देपंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत झालेल्या दरवाढीचा कोणताही परिणाम होणार नाही.आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या किंमतीमुळे देशातील गॅसच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली : एकीकडे कोरोनाचे संकट असताना आता सामान्य ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत आजपासून वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या किंमतीमुळे देशातील गॅसच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे.

राजधानी दिल्लीत विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) दरात ११.५० रुपयांची वाढ केली आहे. इंडियन ऑइलने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आधी दिल्लीत या गॅस सिलिंडरची किंमत ५८१.५० रुपये होती. ती आता ५९२ रुपये प्रति सिलिंडर इतकी झाली आहे. अशाप्रकारे कोलकात्यामध्ये या गॅस सिलिंडरची किंमत ६१६ रुपये झाली आहे. याठिकाणी आधी ५८४.५० रुपयांना गॅस सिलिंडर मिळत होता. कोलकात्यामध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) दरात ३१. ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे दर १ जूनपासून लागू करण्यात आले आहेत.

मुंबईत विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडर किंमतीत ११. ५० रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ होण्यापूर्वी याची किंमत ५७९ रुपये होती. आता दरवाढ झाल्यामुळे ५९०.५० रुपयांना मिळणार आहे. चेन्नई सुद्धा विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३७ रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी चेन्नईत ५६९.५० रुपयांना गॅस सिलिंडर मिळत होता. मात्र, आता १ जूनपासून दरवाढ झाल्यामुळे ६०६.५० रुपयांना मिळणार आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत झालेल्या दरवाढीचा कोणताही परिणाम होणार नाही. पीएमयूवायच्या (PMUY) लाभार्थ्यांना ३० जूनपर्यंत विनामूल्य गॅस सिलिंडर मिळेल. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत घरगुती गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली होती.

दरम्यान, यापूर्वी मे महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात घट करण्यात आली होती. मे महिन्यात दिल्लीत प्रति गॅस सिलिंडरची किंमत ७४४ रुपयांवरून ५८१.५० इतकी करण्यात आली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाली होती. 

टॅग्स :गॅस सिलेंडर