Join us

LPG Cylinder Price: गॅस सिलिंडर 91.50 रुपयांनी स्वस्त झाला; नव्या आर्थिक वर्षातील पहिली गुडन्युज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 9:08 AM

Gas cylinder Price Today: मार्चमध्ये कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमती ३५० रुपयांनी वाढविल्या होत्या. तर घरगुती गॅसच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती.

आजपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. महागाईने आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेल काही कमी होण्याचे नाव घेत नाहीएत. अशातच पेट्रोलिअम कंपन्यांनी गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरची किंमती वाढविली होती. परंतू कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीही मोठ्य़ा प्रमाणावर वाढविल्या होत्या. आता हॉटेल, बेकरी सारख्या व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. 

कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात कंपन्यांनी 91.50 रुपयांची कपात केली आहे. यामुळे आजपासून दिल्लीत हा गॅस सिलिंडर 2,028 रुपयांना मिळणार आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे एएनआयला सुत्रांनी सांगितले आहे. 

मार्चमध्ये कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमती ३५० रुपयांनी वाढविल्या होत्या. आता त्यातील ९२ रुपये घटविले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. 

विविध शहरांतील दर...या कपातीनंतर विविध शहरांतील दरांतही बदल झाले आहेत. कोलकातामध्ये 2132 रुपये, मुंबईत 1980 रुपये, चेन्नईमध्ये 2192.50 रुपये अशा किंमती झाल्या आहेत. तर घरगुती गॅसचे दर जैसे थेच असून दिल्लीमध्ये 1103 रुपये, मुंबईत 1112.5, कोलकातामध्ये 1129 आणि चेन्नईमध्ये 1118.5 रुपये असे आहेत. गेल्या महिन्यात या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती.  

टॅग्स :गॅस सिलेंडर