नवी दिल्ली : देशात सणासुदीच्या काळात महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरच्या (LPG cylinders) दरात कपात करण्यात आली आहे.
एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी मोठी कपात करण्यात आली आहे. मात्र, ही दरकपात केवळ व्यावसायिक सिलिंडरवरच झाली आहे. तर घरगुती वापराच्या 14.2 किलो गॅस सिलिडंरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्याच्या किमती स्थिर आहेत.
1 सप्टेंबरपासून व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर जवळपास 100 रुपयांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत 1 इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 91.50 रुपयांनी घट झाली आहे. कोलकात्यात 100 रुपये, मुंबईत 92.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 96 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.
दिल्लीमध्ये एलपीजी गॅसचा दर प्रति सिलिंडर 1885 एवढा झाला आहे. तो पूर्वी 1976.50 रुपये एवढा होता. कोलकातामध्ये घसरणीनंतर गॅस सिलिंडरचे दर 1995.5 रुपयांवर पोहोचले आहेत. पूर्वी ते 2095 रुपये इतके होते. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये नव्या दरानुसार एका व्यवसायिक गॅस सिलिंडरसाठी आता 1844 रुपये मोजावे लागणार आहेत.
6 जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच सिलिंडर अजूनही त्याच किमतीत मिळेल. इंडेन सिलिंडरची किंमत दिल्लीत 1053 रुपये असेल, तर कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत 1052 रुपये, चेन्नईमध्ये 1068 रुपये असेल.
गॅस कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला सिलिंडरची किंमत ठरवतात. यापूर्वी ऑगस्टमध्येही सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. तसेच, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 36 रुपयांची कपात करण्यात आली होती.
हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार?
दरम्यान, सिलिंडरच्या दरात वाढ सुरूच असल्याने हॉटेल व्यवसायिकांनी अन्नपदार्थांचे दर देखील वाढवले होते. मात्र, आता सलग दोन महिने गॅस सिलिंडरच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे हॉटेलमधील जेवणाचे दर कमी होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.