LPG Price 2014 Vs 2023: केंद्र सरकारनं देशवासीयांना रक्षाबंधनापूर्वी सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांची कपात करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर देशात १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत घसरण झाली होती. दरम्यान, विना अनुदानीत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती आता सप्टेंबर २०१४ च्या किंमतीवर आल्या आहेत.
इंडियन ऑईलनुसार १ सप्टेंबर २०१४ रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर दिल्लीत ९०१ रुपये, कोलकात्यात ९४५ रुपये, मुंबई ९२६.५ रुपये आणि चेन्नईत ९०२.५० रुपये होते. आता सप्टेंबर २०२३ मध्ये म्हणजेच तब्बल ९ वर्षांनतर दिल्लीत सिलिंडरची किंमत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये चेन्नईत ९१८.५० रुपये झाली आहे.
दरम्यान, सरकारनं घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठ्या कपातीची घोषणा केली होती आणि ३० ऑगस्ट पासून सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांची कपात करण्यात आली होती. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना यावर २०० रुपयांचं अनुदानही सरकारनं दिलंय. त्यांच्यासाठी सिलिंडरची किंमत ४०० रुपयांनी स्वस्त झालाय. या कपातीनंतर १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमतही १५८ रुपयांनी कमी करण्यात आली होती. गेल्या महिन्यातही यामध्ये ९९.७५ रुपयांची कपात करण्यात आलेली.
३५ कोटी कुटुंबांना फायदायासोबत सरकारनं पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत ७५ लाख नवे मोफत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा केली आहे. यानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांची एकूण संख्या १०.३५ कोटी होईल. गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपातीचा फायदा ३५ कोटी कुटुंबीयांना होणार आहे. या कपातीसाठी सरकार अनुदान देत आहे, म्हणजेच प्रत्येक सिलिंडरवर २०० रुपयांची रक्कम सरकार पेट्रोलियम कंपन्यांच्या खात्यात टाकणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संधी साधलीयेत्या वर्षात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यापूर्वीच सरकारनं संधी साधली आहे. गॅसच्या किंमतीत कपात करण्याची मागणी दीर्घकाळापासून होत आहे. विरोधकांनीही गॅस सिलिंडरच्या किंमतीवरुन सरकारला घेरण्याचे प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री स्मृती ईराणी यांच्या जुन्या वक्तव्यांची आठवणही करुन दिली होती. निवडणुकीच्या वर्षातच आता सरकारनं संधी साधली आहे.